मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, पटोलेंना शुभेच्छा – नितीन गडकरी

0
21

नागपूर,दि.14ः- नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर माझा आर्शीवाद कायम राहिल असे सांगत मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत.तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत असे वक्तव्य नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे. राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे. मी जे पाच वर्षात काम केले, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागणार आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी सध्या खासदार आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने दलित मतदारांची संख्या जास्त असल्याने दलितांची मते निर्णायक असतील.त्यासोबतच मुस्लीम मतेही निर्णायक राहणार आहेत. त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय या मतदारसंघात येत असल्याने हा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांना 5 लाख 87 हजार मते मिळाली होती. काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचा पराभव या निवडणुकीत झाला होता. विलास मुत्तेमवार यांना 3 लाख 3 हजारे मते मिळाली होती.