लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पोलीस पाटलांची कार्यशाळा

0
22

वाशिम, दि. १४ :  गावपातळीवर पोलीस प्रशासन आणि जनता यामधील पोलीस पाटील हा अत्यंत महत्वाचा दुवा म्हणून ओळखला जातो. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने बंदोबस्ताची कर्तव्ये व जबाबदाऱ्या या विषयावर जिल्ह्यातील पोलीस पाटलांची कार्यशाळा आज पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाली.

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कार्यशाळेत निवडणुकीच्या संदर्भाने पोलीस पाटील यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या, पोलीस पाटील यांचे निवडणूक काळातील निःपक्ष वर्तन व घ्यावयाची दक्षता, निवडणूक प्रचार काळातील निवडणूक आदर्श आचारसंहिता आणि मतदानाच्या दिवशी आदर्श आचारसंहिता या विषयवार सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित पोलीस पाटलांनी निवडणूक काळात आपली कर्तव्ये चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडून लोकसभा निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३५० पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी महिला पोलीस पाटील छाया डहाके यांचा सत्कार करण्यात आला. छाया डहाके यांनी नारीरत्न हा कवितासंग्रह लिहिला असून त्या मानोरा तालुक्यातील भुली येथील पोलीस पाटील आहेत.

संपर्क आणि समन्वयासाठी विशेष व्यवस्था म्हणून जिल्ह्यातील पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचा व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात येत आहे. निवडणूक बंदोबस्त काळात गावपातळीवर पोलीस पाटील यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक आणि पोलीस दलास पोलीस पाटील यांची लागणारी मदत जलदगतीने देवाण-घेवाण होईल, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.