विद्यार्थिनीचा योग्य उपचाराअभावी मृत्यू

0
12

नांदेड़, दि. १५ :जिल्ह्यातील मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात १४ मार्च रोजी नववी वर्गात शिक्षण घेणाऱ्या प्रतीक्षा व्यंकट सोनकांबळेला दाखल करण्यात आले. मात्र काही तासातच शुक्रवारी १५ मार्च रोजी पहाटे उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. दरम्यान तिच्या मृत्यूस उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार आहेत, तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकानी केलाआहे. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी मुखेड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करा या मागणीसाठी नातेवाईक व नागरिकांनी वैद्यकीय अधिक्षकांना घेराव घातला.

मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालय सदैव चर्चेत राहणारा रुग्णालय आहे येथे रुग्णांची हेळसांड, डॉक्टरांची अनुपस्थिती व औषधांचा तुटवडा या बाबी उपजिल्हा रुग्णालयात रोजचायच झालेल्या आहेत. दि. १४ मार्च रोजी मुखेड येथील फुलेनगरमध्ये राहणारी प्रतीक्षा व्यंकट सोनकांबळे (१४) या नववी वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलीस तिच्या वडिलांनी दुपारी चार वाजता उपजिल्हा रुग्णालयात ताप आल्याने दाखल केले. यानंतर तिला साडेपाच वाजता वार्ड क्रमांक ४१ मध्ये दाखल करून घेण्यात आले. यानंतर त्या मुलीचा ताप वाढत गेला, याबाबत तिच्या वडिलांनी वार्डामध्ये रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिकेडेही सांगितले. यानंतर आठ वाजता कर्तव्यावर आलेल्या डॉक्टरांनी तिच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले व त्या मुलीचा ताप वाढत गेला. दि.१५ मार्च रोजी पहाटे सकाळी चार वाजता त्या मुलीचा मृत्यु झाला.

यानंतर त्या मुलीच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांना घेराव घालून जाब विचारला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृत मुलीचे दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.माझ्या मुलीचा मृत्यूला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व डॉक्टर तसेच परिचारिका जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार मुलीचे वडील व्यंकट गणपत सोनकांबळे यांनी दिली. दरम्यान याबाबत मुखेड पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेबाबत त्या मुलीवर उपचार केलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.के.टाकसाळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधून विचारणा केली असता ते म्हणाले की, माझी ड्युटी रात्री आठ वाजता सुरू झाली. यानंतर रुग्ण मुलीवर योग्यरित्या उपचार सुरू झाला. त्यात अँटिबायोटिक्सचा डोस व सलाईन लावण्यात आले. सदर मुलीच्या वडिलांना उपचारादरम्यान रक्त व लघवी तपासण्यासाठी सांगण्यात आले होते. उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.