बेपर्वाई, कंत्राटदाराची व पालिका अधिकाऱ्यांची….

0
12

शेखर भोसले/मुलुंड पूर्व,दि.16ःः नवघर रोड येथे केंपस हॉटेल ते टाटा कॉलनी नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला असलेले पेव्हर ब्लॉक्स काढून तेथे डांबरीकारणाचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे.पालिकेच्या नियमानुसार कोणतेही काम चालू असेल तेथे कामाच्या विस्तृत माहितीचा फलक लावला जातो व ह्या फलकाद्वारे नागरिकांना कामाचे स्वरूप, कंत्राटदाराचे नाव, कामाची मुदत इत्यादींची माहिती मिळते. परंतु असा कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आहे.

तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही आहे. रस्त्याच्या कडेला बेरिकेड लावण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे अपघात होवू शकतात. काढलेले पेव्हर ब्लॉक्स हे काही ठिकाणी पदपथावर टाकलेले दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे मुश्किल झाले आहे. खोदलेल्या रस्त्यावरून चालले तर पाय मुरगळण्याची भीती आणि रस्त्यावरून चालले तर पाठून सुसाट येणाऱ्या गाड्या उडवतील ह्याची भीती लहान मुले, महिला वर्ग व जेष्ठ नागरिकांना वाटत आहे. विकास व्हायलाच पाहिजे पण विकास करताना नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे हे योग्य नाही.

पेव्हर ब्लॉक्स काढल्यामुळे बहुतेक ठिकाणी जमिनीखालून टाकलेले वायर्स व केबल्स बाहेर आलेले दिसत आहे. रस्त्याखालून जाणाऱ्या केबल्स ह्या पालिकेच्या नियमानुसार खोल असाव्या लागतात परंतु ह्या केबल्स नियमानुसार विशिष्ट खोल न ठेवता व त्या केबल्स वाहून नेण्यासाठी खाच (trench) न बनविता सरळ त्यावर खडी टाकायचे कार्य चालू आहे म्हणजे भविष्यात जर का एकादी केबल ब्रेक झाली तर पुन्हा तेथे रस्ता खोदणे आलेच.

ह्यासंबंधीची तक्रार टी वार्ड पालिका सहाय्यक आयुक्त यांच्याकडे दि ७ मार्च रोजी पत्राद्वारे करण्यात आली परंतु त्याला १० दिवस झाले तरी अद्यापही पालिकेने काहीही कारवाई केलेली नाही. कंत्राटदाराला तक्रारीच्या अनुषंगाने काहीही सूचना करण्यात आलेल्या नाही आहेत असे एकंदरीत दिसत आहे. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे केलेली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहचवली जाते का की सरळ संबंधित खात्याच्या इंजिनियर कडे तक्रार जाते ? जर असे असेल तर संबधित इंजिनियर, पालिका अधिकारी कंत्राटदाराला पाठिशी घालायचे काम करतात का? कंत्राटदाराच्या सोयीनुसार राहतात का ? कंत्राटदाराने करावयाच्या आवश्यक त्या गोष्टी केल्या आहे की नाही हे न तपासता व तसेच कंत्राटदाराला आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे, कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळण्याचे आदेश न देता अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे व कंत्राटदाराला त्याने घेतलेल्या कंत्राटातून जास्तीत जास्त लाभ कसा पोहचेल व त्यायोगे आपला जास्तीत जास्त लाभ कसा होईल हेच पाहिले जात असेल का ?

अत्यंत संथ गतीने चाललेल्या ह्या कामात पेव्हर ब्लॉक्स काढताना व नंतर तेथील माती काढताना खूपश्या वायर्स व केबल्स तुटलेल्या आहेत. त्या जोडण्याचे काम टेलिफोन कंपनीचे कारागीर व संबधित यंत्रणेचे कामगार करत आहेत. त्यामुळे देखील रस्त्याच्या कामाला वेळ लागत आहे. कासवगतीने चाललेल्या ह्या कामाबद्दल तसेच इतर यंत्रणेचे झालेल्या नुकसानाबद्दल कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई घेण्यात येणार आहे का, की येथेही कंत्राटदाराला पाठिशी घातले जाणार आहे ?

अश्याच प्रकारे टाटा कॉलनीमध्ये पालिकेने दिलेल्या परवानगीनुसार एका केबल कंपनीने त्यांची केबल टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवलेले काम गेल्या ४ महिन्यापासून अपूर्णावस्थेत आहे. टाटा कॉलनीतील नव्याने बनविलेला रस्ता, केबल कंपनीची केबल टाकण्यासाठी ४ महिन्यापूर्वी खोदण्यात आला होता. केबल टाकून झाली परंतु अद्याप ह्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. का झाले नाही व काम कश्यासाठी थांबले आहे ह्याची काहीच माहिती पालिकेकडून दिली जात नाही आहे फक्त सदर काम हे प्रगतीपदावर आहे एवढेच सांगितले जाते परंतु प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी गेल्या ४ महिन्यांपासून काहीच हालचाल दिसत नाही आहे. नियमानुसार सदर केबल ही ३ फूट खोल असणे जरूरीचे होते. तसेच ही केबल टाकण्यासाठी रस्ता खोदताना बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने बेरिकेड लावणे जरूरीचे होते पण तेव्हा देखील हे बेरिकेड लावण्यात आले नव्हते.

पालिकेचे अधिकारी दिलेल्या मुदतीत कंत्राटदार काम पूर्ण करतो की नाही हे का नाही तपासत व काम चालू असताना सुरक्षेचे नियम पाळले जातात की नाही हे का नाही बघत? पालिका अधिकाऱ्यांच्या ह्या बेमूर्वत वृत्तीमुळे प्रत्येकवेळी कंत्राटदारांचे फावते व कंत्राटदार पुरेपूर याचा फायदा घेवून स्वतःच्या कामगारांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळून आपली पोळी भाजत असतो व अधिकचा फायदा कमवत असतो. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते का ? व काम नियमानुसार, दिलेल्या कार्यपद्धतीनुसार व दर्जानुसार होत नसेल तरी त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करून तसेच चालू ठेवून संपविले जाते का ? नागरिकांच्या तक्रारीला उत्तर देण्याचे दायित्वदेखील पालिकेमार्फत संबंधित अधिकाऱ्याकडून का केले जात नाही?

असे कितीतरी प्रश्न आहेत त्यांचे उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहेत पण ही उत्तरे कधी मिळतील आणि कधी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ संपला जाईल ह्याचे उत्तर देखील पालिका अधिकाऱ्यांनीच द्यावे अन्यथा दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी फक्त ढकलायचे एवढेच काम करू नये.