मुख्य बातम्या:

नक्षल्यांनी पेरलेला भू-सुरूंग केला निकामी

गडचिरोली,दि.17ः- सुरक्षा जवानांसोबत घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी हिरंगे पहाडीवर जमिनीत पेरून ठेवलेला भू-सुरूंग स्फोट मुरुमगाव पोलिस व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या जवानांनी सतर्कता बाळगत शुक्रवारी (१५ मार्च) निकामी केला आहे. यामुळे नक्षल्यांचा घातपाताचा प्रयत्न फसला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा-२0१९ च्या निवडणुका जाहीर करताच गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम संवेदनशील भागात नक्षलवाद्यांनी हिंसक कारवायांना चालना देत दहशत पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव पोलीस मदत केंद्रातंर्गत येत असलेल्या हिरंगे पहाडीवर नक्षलवाद्यांनी जवानांसोबत घातपात घडवून आणण्यासाठी शुक्रवारी जमिनीत भूसुरूंग पेरून ठेवला होता. सदर प्रकार मुरुमगाव पोलीस व सीआरपीएफ जवानांच्या लक्षात येताच त्यांनी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला बॉम्ब निकामी केला. तसेच घटनास्थळावर नक्षल्यांचे साहित्य आढळून आले.

Share