शहराचा विकासच झाला नाही : नाना पटोले

0
16

नागपूर,दि.17 : महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. परंतु नागरिकांच्या हिताचे निर्णय न घेता महापालिकेने मालमत्ता करात दहापट वाढ करून सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा लादला आहे. जी विकासकामे सुरू आहे, ती जनतेला डोकेदुखी ठरत आहेत. नागपूर शहराचा हवा तसा विकासच झालेला नाही, असा दावा नागपूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला.’उपराजधानीत ८० हजार कोटी रुपयांच्या कामांपैकी अर्थसंकल्पातील नेमका किती खर्च झाला, नागपूरकरांवर किती कर्ज लादले, त्याची परतफेड कशी होणार, याबाबत जनतेला वस्तुस्थिती कळावी, यासाठी श्वेतपत्रिका जारी करा’, अशी मागणी करीत भाजपवर पहिला वार केला.

शनिवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. गडकरी ‘मातब्बर’नेते असल्याकडे लक्ष वेधले असता, ‘लोकशाहीत नेते मातब्बर नाही तर, मतदार मातब्बर असतात. यापूर्वीही अशा अनेक नेत्यांविरुद्धची निवडणूक बघितली आहे’, असे पटोले म्हणाले. पत्रपरिषदेस बडे नेते गैरहजर होते, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी हजेरी लावली. शहराध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव प्रफुल्ल गुडधे, अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, रमण पैगवार, संदेश सिंगलकर उपस्थित होते.शहरात डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु या रस्त्यांमुळे पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या घरात पाणी जाते. महापालिकेतील विकास कामे खासगी कंपन्यांना देण्यात आलेली आहेत. शहरात सिमेंटच्या रस्त्यांची काय आवश्यकता होती, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मिहानमध्ये उद्योग आलेले नाही. बाबा रामदेव यांना जमीन दिली, पण उद्योग उभा झालेला नाही. मेट्रो प्रकल्पाला तर महापालिकेची हजारो कोटींची जमीन देण्यात आली असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. नागपूर शहराच्या विकासकामांमध्ये झालेल्या खर्च व एकूण निधीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
नरेंद्र मोदी गुजरातचे असूनही वाराणसी येथून निवडणूक लढवू शकतात. मी तर विदर्भातील आहे. येथील मतदारही आहे. मी बाहेरचा उमेदवार म्हणणे चुकीचे आहे. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे पटोले म्हणाले. भाजपच्या सत्ता काळात देशात शेतकरी व लहान व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, असेदेखील ते म्हणाले. प्रियंका गांधी नागपूर लोकसभा मतदारसंघात ४ किंवा ६ एप्रिलला प्रचार सभेसाठी येणार असल्याची माहिती पटोलेंनी यावेळी दिली.

भाजपने महापालिकेचे अस्तित्वच ठेवलेले नाही. हजारो कोटी रुपयांचे अनेक भूखंड मेट्रोला दान दिले. चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन फोल ठरले. पाणीवितरणाचे काम लखानी यांच्या ओसीडब्ल्यूला दिले. चोवीस तास तर दूर, अनेक भागांत पाणी पोहोचत नाही. दुसरीकडे, मालमत्ताकर दहापट करून नागरिकांना वेठीस धरले, अशी टीका करून पटोले म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांत मिहानचा विकास करण्यात भाजप आणि गडकरी पूर्णत: अपयशी ठरले. रामदेवबाबा यांच्या पतंजलीसाठी कवडीमोल भावाने जमीन दिली.निवडणुकीत विजयी झाल्यास महापालिकेला ताळ्यावर आणू. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या संकल्पनेनुसार मिहानचा नियोजनबद्ध विकास करण्यात येईल. याबाबत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सहमती दर्शवली आहे. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याने याकडे विशेष लक्ष देण्यात येईल. रोजगारांचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील.’