मुख्य बातम्या:

खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी क्रिकेट बुकीला सावनेरातून अटक

नागपूर,दि.17ःःृगुन्हेशाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या खबऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या क्रिकेट बुकीला नंदनवन पोलिसांनी सावनेरमधील लॉजमध्ये छापा टाकून अटक केली. मधू सुरेंद्रकुमार सिंघल ऊर्फ अग्रवाल (वय ४२, रा. नेताजीनगर, जुना पारडी नाका) असे अटकेतील बुकीचे नाव आहे. त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. आशिष सुरेशराव गायकी (वय ३१, रा. अयोध्यानगर), असे जखमी खबऱ्याचे नाव आहे.

मधू अग्रवाल हा क्रिकेट बुकी असून, महागडे अमली पदार्थ एमडीचीही तस्करी करतो. त्याच्या अटकेसाठी गुन्हेशाखेच्या पथकाने खबऱ्या आशिषमार्फत १३ मार्चला सापळा रचला होता. आशिष व राहुल नावाचा पोलिस कर्मचारी एमडी खरेदी करायला गेले. वाठोडा भागात आशिष व राहुल हे मधूला भेटले. त्याच्यासोबत दोन लाख रुपयांमध्ये व्यवहार केला. ४० हजार रुपये कमी असल्याचे सांगून राहुल हा पैसे आणायला गेला. याचदरम्यान गुन्हेशाखेच्या एका कर्मचाऱ्याने मधूला अटकेसाठी सापळा रचण्यात आल्याचे सांगितले. मधू हा आशिषला घेऊन वाठोड्यातीलच कोहिनूर लॉन परिसरात घेऊन गेला. साथीदारांना बोलावून घेतले. मधू व त्याच्या साथीदारांनी पिस्तूलच्या बटने आशिषच्या डोक्यावर वार केला. तर, मधूच्या साथीदारांनी चाकू व लोखंडी रॉडने आशिषवर हल्ला केला. त्याचा मृत्यू झाल्याचे समजून मधू व त्याचे साथीदार तेथून पसार झाले.

यादरम्यान मधूने आशिषजवळील सोनसाखळी, रोख व मोबाइल हिसकावला. काही वेळात आशिषचे साथीदार तेथे पोहोचले. त्यांनी आशिषला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंदनवन पोलिसांनी प्राणघातक हल्ला व लुटपाटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन, सहायक पोलिस आयुक्त घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक चव्हाण, अरविंद भोळे, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, रमेश चिखले, हेडकॉन्स्टेबल सचिन एम्प्रेडीवार, ओंकार, राजेंद्र, दिलीप अवगान, भीमराव ठोंबरे, दीपक तऱ्हेकर, मिथून नाइक यांनी मधूचा शोध सुरू केला. मधू हा सावनेरमधील सुमित लॉजमध्ये असल्याची माहिती नंदनवन पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून सोनसाखळी, मोबाइल व कार जप्त करण्यात आली.

Share