मुख्य बातम्या:

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार

मुंबई,दि.17(वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. पक्षाच्यावतीने पत्रक काढून ही माहिती दिली आहे. मनसे आता कोणाला पाठिंबा देणार याची उत्सुकता आहे.२००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. मराठीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या मनसेने २००९ साली पहिली लोकसभा निवडणूक लढवली.पहिल्याच निवडणुकीत मनसेला मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये चांगली मते मिळाली. मात्र त्यांचा खासदार निवडून येऊ शकला नाही. मनसेच्या उमेदवारामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मार्ग सुकर झाला. २०१४ साली मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी साडेचार वर्षातमोदींवर घणाघाती टीका केली आहे. अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील राज यांच्या रडारवर राहिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते मनसेला आघाडीत घेण्यासाठी उत्सुक होते. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी तशी भूमिका मांडली होती. दोन्ही नेत्यांनी राज यांची भेटही घेतली होती. मात्र मनसेच्या आघाडी प्रवेशाला काँग्रेसने विरोध केला होता. आघाडीने आपले उमेदवार जाहीर केल्याने मनसेला संधी नाही हे स्पष्ट झाले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादीचा प्रचार करणार असे संकेत मिळत आहेत. मात्र राज आपली भूमिका १९ रोजी वांद्रे रंगशारदा येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या मेळाव्यात स्पष्ट करतील, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मनसेच्या भूमिकेविषयी कुतूहल असतानाच रविवारी पक्षाकडून एक पत्रक काढण्यात आले.”मनसे २०१९ ची निवडणूक लढणार नाही, बाकी १९ मार्चला बोलूच” एवढ्या दोनच ओळींचे हे पत्रक आहे. त्यावर शिरीष सावंत यांची स्वाक्षरी आहे.

Share