आजपासून निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ

0
22

भंडारा/यवतमाळ, दि. 18 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 च्या निवडणुकीचा कार्यक्रम 10 मार्च  2019 रोजी  जाहीर केला आहे. त्यानुसार 11 भंडारा-गोंदिया, 14- यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याला 18 मार्च 2019 पासून सुरवात होणार आहे.आगामी लोकसभा निवडणूक राज्यात चार टप्प्यात होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 18 मार्च आहे. याच दिवसापासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्याला सुरवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिनांक 25 मार्च 2019 असून उमेदवारांच्या पत्राची छाननी 26 मार्च रोजी करण्यात येईल. 28 मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.

अर्ज दाखल करतांना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशन पत्र नमुना 2 – अ, नमुना – 26 (नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपथ), शपथेचा किंवा दृढकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे. यासर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवाराची अपराधिक माहिती, उमेदवाराकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोषसिध्द ठरविण्यात आले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षात आयकर विवरणपत्रात दर्शविण्यात आलेले एकूण उत्पन्न, पॅन क्रमांक व आयकर विवरण पत्र भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील, भारतीय दंड संहितेचे कलम, दोषसिध्द ठरविले असेल तर ठोठावलेली शिक्षा, त्याविरोधात केलेले अपील आदी माहिती सादर करावयाची आहे.

तसेच जंगम मालमत्ता संदर्भात हातातील रोख रक्कम, बँक खात्यातील ठेवी, बंधपत्रे, ऋणपत्रे / शेअर्समधील गुंतवणूक, वैयक्तिक कर्जे, जडजवाहिर, सोने-चांदी व मौल्यवान वस्तुंचा तपशील, एकूण स्थूल मुल्य, स्थावर मालमत्तामध्ये शेतजमीन, बिगरशेतजमीन, वाणिज्यिक इमारती, निवासी इमारती, मालमत्तेतील हितसंबंध, बँकेचे / वित्तीय संस्थेचे देय रकमा, आयकराच्या देय रकमा, शैक्षणिक अर्हता आदी तपशील नामनिर्देशन पत्राच्यावेळी सादर करावयाचा आहे.

नामनिर्देशन पत्राकरीता राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांना एक सूचक तर इतरांकरीता दहा सूचक आवश्यक आहे. उमेदवाराचे तीन महिन्याच्या कालावधीतील 2 बाय 2.05 सेमी आकाराचे व पूर्ण चेहरा दिसेल असे कृष्णधवल किंवा रंगीत छायाचित्र असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्राच्या कालावधीत विशेषत: शेवटच्या दिवशी उमेदवार किंवा सूचक सर्व कागदपत्रांसह दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असले पाहिजे. नंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी अथवा कोणत्याही कारणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश नाकारला जाईल. सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम 25 हजार रुपये तर अनुसूचित जाती / जमातीतील उमेदवारासाठी अनामत रक्कम 12 हजार 500 रुपये आहे. अनुसूचित जाती / जमातीतील उमेदवाराला अनामत रकमेसाठी जात प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.