पोलीस असल्याचे समजून केली ‘त्या’ शिक्षकाची हत्या, नक्षलवाद्यांचा माफीनामा

0
15
file photo

गडचिरोली,दि.21ःःयेथील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेच्या आठवडाभरानंतर नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी सचिवाच्या नावे आलेल्या पत्रात मेश्रात यांची हत्या चुकीच्या माहितीतून झाल्याचे स्पष्ट करत मेश्राम यांच्या पत्नीची माफी मागितली आहे. आमचे लक्ष्य ते नव्हते, त्यांना पोलीस असल्याचे समजून गोळ्या झाडल्याचे पत्रात म्हटले आहे.
मृत शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे ही कोरची तालुक्यातल्या बोटेझरी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. शिक्षक मेश्राम पत्नीकडे गेले असताना कोंबड बाजारात त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडल्या. यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांनी काढलेल्या निषेध मोर्चात ‘आमच्या शिक्षकाचा का दोष?’ असा सवाल केला होता. शिक्षक मेश्राम किंवा त्यांचा मुलगा आमचे मुळीच लक्ष्य नव्हते. आमच्या इंटेलिजेन्सच्या चुकीमुळे सदर हत्येची घटना घडली. मान झुकवून आम्ही आपल्या कुटुंबियांची माफी मागतो, असा मजकूर त्या पत्रात नमूद आहे.आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक व पत्रकारांचीसुद्धा नक्षलवाद्यांनी या पत्राच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी दहशतीत राहू नये. अन्यायकारक व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारणे हे आमचे काम आहे, असा आशय पत्रात नमूद केला आहे.