राष्ट्रवादीचे उस्मानाबाद आणि माढ्याच्या उमेदवार घोषित,भंडारा-गोंदियावर नजर

0
10

बारामती,दि.23- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारला अखेर माढा आणि उस्मानाबादच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे.तर भंडारा-गोंदियाच्या जागेवर आज दुपारनंतर निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याआधी 16 उमेदवारांची यादी जारी करण्यात आली होती. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे एकूण 18 उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे.त्यापैकी 1 जागा अमरावतीची युवा स्वाभीमानच्या नवनीत राणा यांना तर हातंकणगलेची जागा राजू शेट्टी यांना दिली आहे.

भंडारा-गोंदियाच्या जागेवर आज दुपारी अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर किंवा भंड़ारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.माजी खासदार नाना पटोले यांनीही फुंडे यांच्या नावाला पसंती दिल्याचे वृत्त आहे.तर विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांनी तिकीट न मिळाल्यास भाजपकडे जाण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे.या सर्व परिस्थितीत अखेरच्या मिनिटाला प्रफुल पटेलच उमेदवार राहू शकतात हे सुध्दा नाकारता येत नसल्याचे वृत्त आहे.