राज्यातील जनता महाआघाडीच्या पाठीशीःआ.जयंत पाटील,विखे पाटलांनी पाठ फिरवली

0
16

काँग्रेस २४, राष्ट्रवादी काँग्रेस २०, स्वाभिमानी शेतकरी संघटना २, बहुजन विकास आघाडी १,  युवा स्वाभिमान पक्ष १ जागा लढवणार

मुंबई,दि.२३ – भाजप शिवसेनेची महायुती देशाकरिता महाआपत्ती आहे. ही आपत्ती घालवण्यासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप,स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी,पीआरपी, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह राज्यातील ५६ पक्षांनी संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्थापना केली असून, ही महाआघाडीच भाजप-शिवसेनेला सत्तेवरून पायऊतार करेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील,शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आ. हितेंद्र ठाकूर, पीआरपीचे अध्यक्ष आ. जोगेंद्र कवाडे, युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आ. रवी राणा यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला सर्व ५६ पक्ष व संघटनेचे नेते उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वातील महाआघाडीची पत्रकार परिषद शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. परंतु, विधानसभेत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यांचा मुलगा सुजय विखे यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.
देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. शेतकरी, कष्टकरी,महिला, दलित, अल्पसंख्यांक,तरुण, वंचित, पिडीत या सर्वांना न्याय देण्यासाठी महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे. हे सरकार केवळ जुमलेबाजी करते आहे.सर्वसामान्यांमध्ये सरकारविरोधात चीड आहे. राज्यातील जनतेचे या सरकारने हाल केले आहेत.जातीवादाला खतपाणी घालून सामाजिक तणाव वाढवण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची, आरक्षणाच्या मुद्यावर धनगर, मराठा, मुस्लीम समाजाची फसवणूक भाजप शिवसेनेने केली आहे. दलित आदिवासींच्या योजना शिष्यवृतीसाठी पैसा दिला जात नाही. देशात साम, दाम, दंड,भेदाचा वापर खुलेआम सुरु आहे. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व समविचारी पक्ष एकत्र आल्याचे खा. चव्हाण म्हणाले.
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता संयुक्त पुरोगामी महाआघाडीला पाठिशी उभी राहिल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. लोकशाही टिकवण्यासाठी सगळे समविचारी धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्याचा आनंद झाल्याचे ते म्हणाले. या सरकारमुळे त्रस्त झालेल्या जनतेला चांगले दिवस आणण्यासाठी संयुक्त पुरोगामी महाआघाडीची स्थापना करण्यात आली आहे.
खा. अशोक चव्हाण यांनी महाआघाडीची घोषणा केल्यानंतर या आघाडीला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी अनुमोदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पाठच्या दाराने शुभेच्छा देतात. यावरून भाजपचा दुटप्पी चेहरा समोर आला आहे. खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन भाजप शिवसेना सरकारने पाळले नाही. पण महाआघाडीचे सरकार आल्यावर शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ. निवडणुकीत महाआघाडीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळेल, असे आ. पाटील म्हणाले.
देशहितासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही सर्वच समविचारी पक्षांना महाआघाडीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करत होतो. परंतु काही पक्षांनी काही ना काही कारणे देवून महाआघाडी होवू नये, असेच प्रयत्न केले. ते लोक भाजपची बी टीम म्हणून कार्यरत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. जातीयवादी भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही विचार केला. त्यानुसार आम्ही मित्रपक्षांना सामावून घेतले आहे. मागील ५ वर्षात देशात उत्तम काम झाल्याचा दावा भाजप करते. पण हे खरे असते तर राज्यातील भाजप-शिवसेनेच्या एकूण ४८ उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचाराधारेच्या लोकांना दिली आहे, असा टोला त्यांनी लगावला. चांगल्या लोकांच्या मागे विनाकारण चौकशीचा ससेमिरा लावायचा असे धोरण भाजप सरकारने राबवायला सुरुवात केली आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.
मताचे विभाजन होवू नये म्हणून शेकापने ५२ वर्षात प्रथमच यंदाची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत शेकापने एकही जागा मागितलेली नाही. जागेपेक्षा संविधान जपणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागले पाहिजे. त्यामुळे या महाआघाडीला साथ द्यावी, असे आवाहन शेकापचे अध्यक्ष आमदार जयंतभाई पाटील यांनी यावेळी केले.
राज्यातील सर्वसामान्य शेतकरी,बेरोजगार, विदयार्थी अशा सर्वच घटकांवर भाजप शिवसेना सरकार अन्याय करत असून, शेती क्षेत्राचा आणि अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा या सरकारने केला आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली लुच्च्या लोकांचे दिवस आम्हाला मिळाले आहेत. सामाजिक, धार्मिक ऐक्य धोक्यात आणले आहे, असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केला. या राज्यात जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. एका एकाचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. संविधान धोक्यात आले आहे. महत्वाच्या संस्था सुद्धा धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा नेता म्हणून तणनाशक औषध फवारणी करून कमळाचे हे पीक नष्ट करायचे आहे, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत विविध राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि सामाजिक संघटनांनी महाआघाडीला पाठिंबा देणारे पत्र दिले.
यावेळी आ. रवी राणा, हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे यांनीही आपले विचार मांडले.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, शेकापचे नेते अध्यक्ष आमदार जयंतभाई पाटील, कवाडे गटाचे आमदार जोगेंद्र कवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणा,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान, डॉ. राजेंद्र गवई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आ. जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, खासदार हुसेन दलवाई,राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि सरचिटणीस सचिन सावंत,कॉंग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, डेमोक्रॅटिक रिपाईचे कनिष्क कांबळे, युनायटेड रिपाईचे उत्तमराव गायकवाड,गणराज्य संघाच्या श्रीमती सुषमा अंधारे, अर्जुन डांगळे,लोकतांत्रिकचे कपिल पाटील,तानसेन ननावरे, राष्ट्रीय स्वराज सेनेचे श्रीहरी बागल आदींसह ५६ पक्षांनी या महाआघाडीला पाठींबा दिला आहे.