सटवा शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले

0
13

गोरेगाव,दि.29 : देवरी तालुक्यातील डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेची स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असताना गुरूवारी (दि.२८) गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची घटना गुरुवारला सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने याच वेळेत विद्यार्थी जेवनासाठी वर्गखोली बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. तीन दिवसात लागपोठ घडलेल्या दोन घटनांमुळे जि.प.शाळांच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.त्यातच या शाळा खोलीच्या बांधकामातील गुणवत्तेसोबतच शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यप्रणालीवर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
गुरूवारी (दि.२८) सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास विद्यार्थी जेवनासाठी शाळेच्या आवारात बसले होते.याच दरम्यान इयत्ता सातव्या वर्गाच्या खोलीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. मोठा आवाज झाल्याने शिक्षकांनी वर्गखोलीत जावून पाहिले असता स्लॅबच्या प्लास्टरचा मोठा भाग पडलेला आढळला. त्यानंतर लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्या वर्ग खोलीत न बसण्याची सूचना दिली. तसेच केंद्रप्रमुख व गोरेगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना याची माहिती दिली. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.