युती उमेदवाराच्या प्रचार सामग्रीतून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाद

0
35
शिवसेना जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र नसलेले पत्रक

गोंदिया,दि.30 : राज्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली आहे.त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली प्रचार सभाही कोल्हापूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख झाली. आणि साडेचार वर्ष राजीनामा हातात घेणारी शिवसेना अखेर सत्तेसाठी भाजपकडे वळली.असे असताना भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही भाजप सेनेची युती झाली आहे. लोकसभेची उमेदवारी तर जाहिर झाली परंतु विधानसभेच्या मतदारसंघावरुन शिवसेनेत अद्यापही स्पष्टता नाही.आधी भंडारा व गोंदिया हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ सेनेकडे होते.त्यामुळे युतीमध्ये सुध्दा हेच मतदारसंघ कायम राहतील की नाही यात शिवसेनेचे पदाधिकारी पेचात पडले आहेत.तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघावर आपलाच दावा राहणार असल्याचे म्हटल्याने स्थानिक नेत्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे.त्यामुळेच की काय विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी जे साहित्य तयार करण्यात येत आहेत किंवा सोशल मिडियावर टाकण्यात येत आहेत.त्या साहित्यामध्ये कुठेही गोंदिया शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे व भंडारा जिल्हाप्रमुख माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे छायाचित्रच दिसत नसल्याने शिवसैनिकात संतापाची लाट दिसून येत आहे.शिवसैनिक आमची युती असली तरी आम्ही शिवसेनाप्रमुखांचा आदेश म्हणून स्वंतत्रच प्रचार करणार असे सांगत प्रचाराला निघाले आहेत.त्यातच युतीच्या उमेदावाराच्या प्रचाराकरीता येत्या 3 एप्रिल रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली असून त्या जाहिर सभेच्या पत्रकातील विनीतमध्येही शिवसेनेला डावलण्यात आल्याने चांगलीच नाराजी धुमसू लागली आहे.

वरिष्ठ पातळीवरील मनभेद दूर झाले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर न झाल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही समन्वय झाले नसल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांची साथ न घेता एकला चलो रे म्हणत उमेदवाराच्या प्रचाराला सुरूवात केल्याचे चित्र गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघात पाहयला मिळत आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यासंह आंभोरा येथे बैठक घेतांना

गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १४ उमेदवार रिंगणात असून त्यांना चिन्ह वाटप सुध्दा झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १0 दिवस मिळणार असून कमीत कमीत दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी दिवसरात्र एक केल्याचे चित्र आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार जरी असले तरी खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसेनेच्या उमेदवारामध्ये होणार स्पष्ट आहे.युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. मात्र युतीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला त्यासाठीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उघडपणे उमेदवारीला विरोध करीत निवडणुकी दरम्यान प्रचारात सहभागी न होता घरी बसणार अशी भूमिका सुध्दा शिवसैनिकांनी घेतली होती. त्यामुळेच या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्वच काही आॅलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. मातोश्रीवरुन आदेश झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म म्हणून वैर बाजुला ठेवून युतीच्या उमेदवाराचा प्रचारात  सक्रीयपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भाजपा नेते प्रचारा दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनासोबत घेत नसल्याचे चित्र आहे.
एवढेच नव्हे तर प्रचारासाठी वाहने, प्रचार साहित्य यांची सुध्दा गरज आहे का याची सुध्दा विचारणा करीत नसल्याची भावना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या निमंत्रणाची वाट न पाहता युतीधर्म म्हणून एकला चलो रे म्हणत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र प्रचारासाठी मतदारांमध्ये जातांना भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळे फिरत असल्याने मतदारांना सुध्दा खरोखरच युती झाली का असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या एकला चलो रे भूमिकेचा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.गोंदिया विधानसभेसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे हे प्रमुख दावेदार असल्याने त्यांना या मतदारसंघात जाणीवपुर्वक डावलले जात असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.