मिसपिरी ग्रामपंचायतीचा निवडणुकीवर बहिष्कार

0
22

देवरी,दि.31ः-तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षल प्रभावित गटग्रामपंचायत मिसपिरी येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबर २0११ रोजी जाळून टाकले होते. यामुळे गावातील नागरिकांना महत्त्वपूर्ण दाखले मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येत्या ११ एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून, ग्रामसभेनेही तसा ठराव घेतला आहे.
मिसपिरी येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी जाळून टाकल्यानंतर नागरिकांच्या उपयोगात येणारे जन्म-मृत्यू नोंदवही तसेच इतर महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून नष्ट झाले. ग्रामस्थांच्या मागणीवरून अंगणवाडी शाळेचे दाखल खारीज व आरोग्य विभागाचे नोंदणीनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करून व ग्रामसभेची मंजुरी घेऊन २८ डिसेंबर २0१५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांच्यामार्फत मुंबई मंत्रालयात पाठविण्यात आले. परंतु त्या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही.
त्यातच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ३0 ऑगस्ट २0१८ रोजी ग्रामसभेने एक ठराव घेतला. जोपर्यंत शासन मागणी पूर्ण करीत नाही, तोपयर्ंत २0१९ व पुढे होणार्‍या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ठराव पारित करून त्याचे निवेदन १४ सप्टेंबर २0१८ रोजी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला देण्यात आले. परंतु आजपयर्ंत या निवेदनाकडे किंवा ठरावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यातच २0१९ ची लोकसभा निवडणूक ११ एप्रिल रोजी पार पडत आहे. त्या दृष्टीकोनातून घेतलेल्या ठरावानुसार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.