अटलधामच्या ठिकाणी शिवसेना उभारणार अटल उद्यान

0
13

गोंदिया,दि.01ःःगोंदिया-बालाघाट मार्गावर येत्या 3 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नियोजित करण्यात आलेल्या जागेला भारतीय जनता पक्षाच्यावतीने अटलधाम हे नाव देण्यात आले आहे.माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी बाजपेयी हे एक महान व्यक्ती राहिल्याने त्यांच्या स्मृती गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात नेहमीच स्मरणात राहाव्यात यासाठी अटलधाम नाव दिलेल्या जागेवर 11 एप्रिलला मतदान संपल्यानंतर त्याठिकाणी मोठे भव्य असे उद्यान तयार करुन त्याठिकाणी स्व.अटलबिहारी बाजपेयी यांची भव्यदिव्य पुर्णाकृती मुर्ती उभारुन अटल उद्यान निर्माण करण्यावर शिवसेना विचार करीत असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे,उपजिल्हाप्रमुख सुनिल लांजेवारी यांनी दिली आहे.

सोबतच या निवडणुकीत आम्ही युतीचा धर्म पाळणार असून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मात्र शिवसेना सोबत नको असेच चित्र दिसत आहे.त्यामुळे गोंदिया-भंडारा मतदारसंघात भाजप ज्यापध्दतीने शिवसेनेसोबत काम करीत आहे,त्या सर्वप्रकरणाची माहिती संपर्कप्रमुखमार्फेंत मातोश्रीवर देण्यात आल्याचेही ते म्हणाले.कुठल्याच मतदारसंघात आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याचेही म्हटले आहे.राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिरोडा तालुक्यात भाजप सेना युती उमेदवाराचा प्रचार केला त्यावेळी सुध्दा तिरोड्यातील उपजिल्हाप्रमुखासह,तालुकाप्रमुख व शाखाप्रमुखांनाही विचारण्यात आले नाही.तर चिखली येथे सुनिल मेंढे यांनी घेतलेल्या बैठकीतही शिवसेनेला महत्व दिले नसल्याची खंत व्यक्त केली आहे.या मतदारसंघातील समन्वय व सयोंजकाची भूमिका ही नागपूर येथील आमदार डाॅ.परिणय फुके यांच्याकडे असून ते गोंदिया जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत.मात्र त्यांनी शिवसेनेला सोबत घेण्याएैवजी तो टोला जिल्हाध्यक्षांकडे हाणल्याची चर्चा आहे.प्रचार सामग्रीतही शिवसेनेला डावलल्याने तिरोडा मतदारसंघात तर 15 हजाराहून अधिक मताने युतीचा उमेदवार मागे राहील अशी शंका शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.तर दुसरीकडे रविवारला गोंदिया विधानसभा मतदारसंघात उमेदवाराने प्रचार दौरा करतांना शिवसेना जिल्हाप्रमुखासह तालुकाप्रमुख ,विधानसभा प्रमुखांनाही विचारले नसल्याने संताप व्यक्त केले जात आहे.