‘स्वीप’ उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा कृतीशील सहभाग आवश्यक- दीपक कुमार मीना

0
19
????????????????????????????????????
  • मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले

वाशिम, दि. : जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांत सर्व शासकीय विभागांनी सक्रीय सहभाग घेवून मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज केल्या. जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात आयोजित ‘स्वीप’ समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर आदी उपस्थित होते.श्री. मीना म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाभर प्रभावी मतदार जागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. याकरिता स्वीप समितीमधील सदस्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. ‘स्वीप’ शाळा, महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग घेवून त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान केले पाहिजे. त्यासाठी मतदान जनजागृती करण्यासाठी रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पत्रलेखन, मतदार जागृती रॅली आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर १५ अत्यावश्यक किमान सुविधा (एएमएफ) पुरविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबतही श्री. मीना यांनी सूचना केल्या. दिव्यांग आणि महिला मतदारांमध्ये जागृती करून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांग मतदारांना मतदार चिट्टी पोहोच करणे, त्यांना मतदानाकरिता घेवून येण्यासाठी मदत करणे आदी कामांमध्ये आशा वर्कर्स संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) यांना मदत करतील. महिला मतदारांसोबत आलेल्या लहान मुलांकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था केली जाणार असल्याचेही श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.

घंटागाडीच्या सहाय्याने होणार मतदार जागृती

 जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती केली जाणार आहे. स्वीप समितीच्या आज झालेल्या बैठकीत नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना यांनी याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.