पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ एप्रिलला गोंदियात

0
21
– पत्रपरिषदेत भाजपा जिल्हाध्यक्षांची माहिती
गोंदिया,दि.१ः-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालाघाट रोड टी पार्इंट, बायपास मार्ग परिसरातील अटलधाम मैदानावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आज, १ एप्रिल रोजी पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पत्रपरिषदेत बोलताना पटले म्हणाले की, ही निवडणूक देशाला मजबूत करण्यासाठी असून तळागळातील शोषीत, दलित वर्गाला आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी महत्वाची आहे. केंद्र व राज्य शासनाने गत पाच वर्षात अनेक योजना राबवून त्यादृष्टीने वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक देशाच्या हितासाठी महत्वाची आहे. या सभेत प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महाराष्ट्र भाजपा प्रभारी सरोज पांडे, उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे, म्हाडा अध्यक्ष तारीक कुरेशी, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, आ. चरण वाघमारे, आ. अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आ.राजेश काशीवार, सर्व माजी खासदार, माजी आमदार तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सभा सुरळीत पार पडावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.