शेतक-यांसाठी स्वतंत्र बजेट, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात महत्वकांक्षी आश्वासन

0
13

नवी दिल्ली,दि.02(वृत्तसंस्था)ः- 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रकाशित केला आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प पूर्वी होता. त्याच धर्तीवर आता शेतक-यांचाही स्वतंत्र अर्थसंकल्प सुरू करण्याचे मोठे आश्वासन काँग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, कर्जफेड करू न शकलेल्या शेतक-यांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूदही वगळण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी जाहीरनाम्याची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली.शेतक-यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा अशी मागणी सातत्याने पुढे येत होती त्यावर पहिल्यांदाच कुठल्यातरी राजकीय पक्षाने पुढाकार घेतला आहे.

उग्रवादी कारवायांमुळे अशांत असलेल्या पूर्वोत्तर भारतातील राज्यांमध्ये तसेच फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांचा धोका असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अफस्पा हा कायदा  लष्कराला विशेषाधिकार बहाल करतो. मात्र या कायद्याचा लष्कराकडून दुरुपयोग करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. तसेच हा कायदा हटवण्यात यावा अशी मागणीही होत असते. दरम्यान, काँग्रेसने या अफस्फा कायद्याबाबत मोठे आश्वासन दिले असून, लष्कराला मिळणारे विशेषाधिकार आणि स्थानिक नागरिकांचा मानवाधिकार यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच अशांत भागातील जनतेचा होणारा छळ, लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

देशभरातील गरीबांसाठी ७२ हजार रूपये देण्याची आम्ही गॅरिंटी देत असल्याचेही ते म्हणाले. मोदी यांनी २ कोटी नोक-यांचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. एवढ्या नोक-या देता येणे शक्य नाही. म्हणूनच आम्ही २२ लाख नोक-या देण्याचे आश्वासन देत आहोत. यातील १० लाख नोक-या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देता येतील. मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देण्याची योजना मोदींनी आणली होती. पण ती योजना फसली. नवीन उद्योग सुरू करणा-या तरूणांना पहिल्या तीन वर्षांत कोणत्याही सरकारी परवानगीची गरज नाही असे धोरण आम्ही आणू असेही राहूल गांधी म्हणाले. मनरेगाअंतर्गत १५० दिवस खात्रीचा रोजगार देणार आहोत. ६ टक्के खर्च शिक्षणावर होईल. आयआयएम, आयआयटीसारख्या उच्च शिक्षणासाठी तरूणांना संधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.