मतदार जागृतीचा संदेश घरोघरी पोहचवा-दीपक कुमार मीना

0
22
????????????????????????????????????
  • शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम

वाशिम, दि. ०२ : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. याकरिता शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून मतदार जागृतीचा संदेश घरोघरी पोहोचविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आज दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप भास्के, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश अहिर, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह शिक्षण, आरोग्य व इतर तालुकास्तरीय अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.

श्री. मीना म्हणाले, मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये शिक्षण विभागाचा सहभाम महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या सहाय्याने त्यांच्या पालकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्राथमिक शाळा स्तरावर ‘पालकांना पत्र’ हा उपक्रम राबविला जावा. माध्यमिक शाळांमध्ये मतदान विषयक घोषवाक्य लेखन स्पर्धा व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या व मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या सर्व युवक-युवतींना मतदानाची शपथ देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

५ एप्रिल रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. मीना यांनी यावेळी केले. महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणे व गतवेळी ज्या मतदान केंद्रांवर जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी मतदान झाले, अशा मतदान केंद्र परिसरात मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.