सामुहिक प्रयत्नातून निवडणूका यशस्वी करा – डॉ. मिश्रा

0
14
????????????????????????????????????

साकोलीदि.5 :-  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले असून प्रशासनाने निवडणूकीची पूर्ण तयारी केली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात समाधानकारक तयारी झाली असून निवडणूका या सामुहिक प्रयत्नामुळे यशस्वी होत असतात. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून योग्य नियोजन करावे. निवडणूकीच्या कामात नियोजन व सातत्य आवश्यक असून प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखून सामुहिक प्रयत्न केल्यास निवडणूका यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी व्यक्त केला.

साकोली येथे निवडणूक तयारीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित प्रशिक्षणात ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी टि.के. काटे, तहसिलदार बाबासाहेब टेळे, मलिक विराणी, संतोष महल्ले व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर उपस्थित होते. निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी निवडणूक कार्याचा आढावा घेतला. साकोली विधानसभा क्षेत्रात ३९४ मतदान केंद्र आहेत. १ लाख ५९ हजार ५३८ पुरुष तर १ लाख ५५ हजार १४५ स्त्री असे एकूण ३ लाख १४ हजार ६८३ मतदार आहेत. तर ३६१० पीडब्ल्युडी मतदार आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांनी दिली.

दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक व नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना मिश्रा यांनी दिल्या. मतदान केंद्रावर आयोगाने निर्देश दिल्या प्रमाणे सर्व सुविधा असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. व्हील चेअर, रॅम्प, पिण्याचे पाणी, शौचालय व मतदारांना बसण्याची जागा या मुलभूत सुविधा मतदार केंद्रात असणे अनिवार्य आहे. यावेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. नाकाबंदी व वाहन तपासणी याबाबत कडक उपाय योजना करण्यात याव्यात, असे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आपण स्वत: काही ठिकाणी आकस्मिक भेटी  देणार असल्याचे मिश्रा म्हणाले.

आदर्श आचार संहिता, सी-व्हीजील ॲप, सुविधा व समाधान याबाबत त्यांनी आढावा घेतला. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत साकोली विधानसभा क्षेत्रात ७६ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त करुन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात बोलतांना मिश्रा म्हणाले की, मतदानाच्या अनुषंगाने सगळया सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतदान कार्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आचार संहितेचे पालन करावेत. आचार संहितेचा भंग होईल अशी कृती आपल्या हातून घडणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांशी सौजन्यपूर्वक वागावे व त्यांना प्रोत्साहित करावे. आपण स्वत: आपल्या कर्तव्याप्रती निष्ठ बाळगावी. प्रशासन तुमच्या सोबत असेल, असे डॉ. मिश्रा म्हणाले.

साकोलीची तयारी उत्तम

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने साकोली उपविभागाने केलेली तयारी उत्तम असल्याचे मत डॉ.मिश्रा यांनी व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे यांचे मिश्रा यांनी कौतुक केले. दिव्यांग मतदारांसाठी सुविधा, उत्तम प्रशिक्षण व्यवस्था, अभिरुप मतदान प्रक्रिया, पोस्टल बॅलेटची व्यवस्था, सखी व आदर्श मतदान केंद्र याबाबतची तयारी उत्तम असल्याचे सांगून डॉ. मिश्रा यांनी समाधान व्यक्त केले.