अमरावतीचा खासदार कांदिवलीचा हवा की अमरावतीचा

0
23

अमरावती,दि.5: प्रचाराला अवघे ११ दिवस शिल्लक असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नुकतीच करजगाव येथील संत गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात जाहीर सभा पार पडली. त्या जाहीर सभेदरम्यान नवनीत राणा यांनी अचलपूर जिल्हा निर्मितीचा निर्धार केला. खासदार झाल्यावर सर्वप्रथम आपण अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी केंद्राकडे ठोस पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.तसेच अमरावतीच्या खासदाराचा पत्ता कांदिवली, मुंबई असा आहे. त्यांना त्यांच्या मूळ पत्त्यावर परत पाठविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित हजारो मतदारांना केले.

अचलपूरमध्ये नवीन एमआयडीसी तयार करून नवीन उद्योगांची उभारणी करू आणि त्या माध्यमातून बेरोजगार तरुण-तरुणींना अधिकाधिक रोजगार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्याचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी मावळते खासदार आनंदराव अडसूळ यांचा खरपूस समाचार घेतला. अडसूळ हे जिल्ह्याच्या विकासात गतिरोधकाचे काम करून विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.
करजगाव व परिसरातील गावांमध्ये संत्रा, पानपिंपरी या पिकांवर आधारित उद्योग निर्माण करून अनेकांना रोजगार प्राप्त करुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या सभेला करजगाव व पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.
भारतीय दलित पँथरचा पाठिंबा
महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणांना भारतीय दलित पँथरने पाठिंबा दर्शविला आहे. राजकमल चौकातील टाऊन हॉलमध्ये नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दलित पँथरच्या पाठिंबा असल्याचे पत्र आनंद वरठे यांनी आमदार रवि राणा यांना दिले.