एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी

0
8
????????????????????????????????????
  • मोटारसायकल व पायदळ रॅलीद्वारे मतदार जागृती
  • ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
  • विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग

वाशिम, दि. ०५ : ‘एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी’ ‘लोकशाहीचा नारा, सर्वांनी मतदान करा’ यासारख्या घोषणांची आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला. निमित्त होत जिल्हा प्रशासनाने ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या मतदार जागृती रॅलीचे. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची मोटारसायकली रॅली व शालेय विद्यार्थ्यांच्या पायदळ रॅलीच्या माध्यमातून शहरातील मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सकाळी ७.३० वाजता मोटारसायकल रॅली तर सकाळी ८ वाजता विद्यार्थ्यांच्या पायदळ रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. गोहाड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) नितीन माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) सुदाम इस्कापे, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सु. गो. वायकर यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरु झालेली मोटारसायकल रॅली अकोला नाका, पाटणी चौक, शिवाजी चौक, पुसद नाका, पंचायत समिती रोड, सिव्हील लाईन रोडमार्गे जिल्हा परिषद इमारत परिसरात आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सर्वप्रथम उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी मतदानाची शपथ दिली.

पायदळ रॅलीमध्ये शहरातील विविध १२ शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरु झालेली पायदळ रॅली अकोला नाकामार्गे पाटणी चौक येथे आल्यानंतर रॅलीचे विभाजन होवून शहरातील विविध प्रमुख मार्गांवर रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये बाकलीवाल हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, मालतीबाई सरनाईक हायस्कूल, रेखाताई हायस्कूल, नगरपरिषद हायस्कूल, जिल्हा परिषद हायस्कूल, हाजी बद्रुद्दीन उर्दू हायस्कूल, लॉयन्स विद्यानिकेतन, नारायणाज हायस्कूल, एस.एम.सी . हायस्कूल व जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

मतदानाचा हक्क जरूर बजावा : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यवतमाळ-लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल व अकोला लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक शांततामय व पारदर्शी वातावरणात पार पडावी, याकरिता प्रशासनाने पूर्व तयारी केली आहे. मतदानादिवशी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, याकरिता ‘स्वीप’ उपक्रमांतर्ग जनजागृती करण्यात येत आहे. मतदान हा आपला हक्क आहे. तो प्रत्येकाने बजावावा. प्रत्येक मतदाराने निर्भयपणे व कोणत्याही अमिषाला बळी न पडता जागरूक राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

नवमतदार, महिला मतदारांनी अवश्य मतदान करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. नवमतदार, महिला मतदार व दिव्यांग मतदारांच्या मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, मदतीसाठी स्वयंसहाय्यक उपलब्ध राहणार आहेत. तसेच पाळणाघर, प्रथमोचार सुविधा सुध्दा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदार विशेषतः नवमतदार, महिला मतदार व दिव्यांग मतदारांनी ११ एप्रिल व १८ एप्रिल रोजी मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.

‘लोकशाहीची भिंत’ उपक्रमाचा शुभारंभ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी ‘लोकशाहीची भिंत’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारतीसह प्रत्येक तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांच्या परिसरात जिल्ह्यात १० ठिकाणी अशा प्रकारची ‘लोकशाहीची भिंत’ तयार करण्यात आली असून याठिकाणी मतदारांनी मतदान जागृतीचा संदेश देवून मतदानाचा संकल्प करावयाचा आहे. आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी ‘निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव, आपण सगळे यात सहभागी होऊ या’ असा संदेश लोकशाहीच्या भिंतीवर लिहून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.