अपक्ष पटलेच्या आवाहनाने भाजप गोंधळली

0
16

गोंदिया,दि.६ एप्रिल : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीचा पारा चांगलाच चढला आहे. काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही पार पडली. परंतु अपक्ष उमेदवार राजेंद्र पटले यांनी भाजप समोर तगडे आवाहन उभे केले असून भाजप या आवाहनाने पूर्ती गोंधळली असून उलट सूलट आरोप करुन पटलेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जनता या निवडणूकीत भाजपला धडा शिकविण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दोन्ही जिल्ह्यात दिसून येत आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र पटले इच्छुक होते. तसेच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन ही दिले होते. तसेच पोटनिवडणूकीत पराभूत उमेदवार माजी आमदार हेमंत पटले यांना ही केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी तुम्हीच उमेदवार राहणार असे सांगितले होते. याशिवाय माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांना ही आश्वासन देण्यात आले होते. लोकसभा क्षेत्रात पोवार समाजाचे प्राबल्य असल्याने या तिघांपैकी एकाला तिकीट मिळेल अशी आस होती. परंतु ऐनवेळी या तिघांचे तिकीट नाकारत नवख्या व विविध प्रकारचे आरोप असलेल्या भंडाराचे नगराध्यक्ष मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे राजेंद्र पटले यांनी बंड थोपटून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शेतकर्‍यांसाठी केलेले आंदोलन तसेच सर्वसामान्य प्रति असलेली त्यांची तळमळ बघता जनाधार वाढू लागला. व यातूनच भाजपचा पाया खालची वाळू सरकु लागल्याचे दिसू लागल्याने भाजप चांगलीच गोंधळली आहे. या गोंधळातूनच भाजपने काही कार्यकर्त्यांना हाताशी धरुन पटले यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु केले आहे. मात्र, या बदनामीला आपण घाबरणार नाही, असे स्पष्ट मत अपक्ष उमेदवार राजेंद्र पटले यांनी व्यक्त केले असून जनता आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे.