मुलुंड येथे गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा जल्लोषात

0
45

शेखर भोसले/मुलुंड; येथे मुलुंड पूर्व व मुलुंड पच्छिम येथे हिंदू नव वर्षाचे स्वागत आज गुढीपाडव्याच्या दिनी अत्यंत जल्लोषात व उत्साहात करण्यात आले. विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येवून अत्यंत नियोजनबद्ध रीतीने या वेळी भव्य अशी शोभा यात्रा काढली. पारंपारिक वेशभूषेत स्त्री, पुरुष, जेष्ठ नागरिक व युवा पिढी मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सामील झाले होते. डोलताश्याच्या गजरात आबालवृद्ध अत्यंत आनंदात एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होते व हिंदू नववर्षाचे स्वागत करीत होते.

मुलुंड पूर्व येथे मुद्रा संस्थेच्या वतीने बॉलिवूड कौरौग्राफेर श्री राहूल शेरेगर यांच्या मार्गदर्शनाखाली बसविलेले महिलांचे लेझीम या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. साधारण १२० महिलांनी या लेझीम पथकात सहभागी होवून अतिशय सुंदर रित्या लेझीम खेळाचे कौशल्य दाखविले. मराठा मंडळ मुलुंड यांनी पंढरीची वारीची कल्पना साकारली होती. ही भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेने उभे असलेल्या रसिक प्रेक्षकांनी सतीश राणे या बालकलाकाराने साकारलेल्या विठूरायाला हात जोडून नमस्कार करत होते. या वारीतील सर्वच वारकरी हातात मृदुंग व टाळ घेवून मुखी विठू नामाचा गजर करीत व संत तुकारामांचे अभंग म्हणत मार्गक्रमण करत होते. स्वागत यात्रेत सहभागी झालेले शिवाजीराजे व घोड्यावर बसलेल्या जिजाऊ माता सर्वांचे आकर्षण ठरत होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक घेवून दोडे शाळेचे विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. काही महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून व नववारी साडी नेसून दोन चाकी वाहनावर स्वार होवून बाईक रेली काढली होते. जुन्नर आंबेगाव मंडळ, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, तरुण उत्कर्ष मंडळ व इतर अनेक संस्था, राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांसह आपली वेगळी कला घेवून या शोभायात्रेत सामील झाले होते. ठिकठिकाणी यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी मोफत पाण्याची व शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. सौ लक्ष्मीबाई शाळेने लेझीम पथकातील महिलांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती. साधारण एक किलोमीटर लांब पसरलेली ही मुलुंड पूर्व येथील शिस्तबद्ध शोभायात्रा सकाळी ७ वाजता संभाजी पार्क येथून सुरू होवून ११ वाजता तुंगवतेश्वर मंदिर येथे समाप्त झाली.

अश्याच पद्धतीने मुलुंड पच्छिम येथे सार्वजनिक उत्सव समिती यांच्या नेतृत्वाखाली मराठमोळ मुलुंड व इतर अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी एकत्र येवून भव्यदिव्य अशी पारंपारिक पद्धतीने व पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली होती. यावेळी देखील हजारों नागरिक हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. ठिकठिकाणी या शोभायात्रेचे परिसरातील नागरिक अतिशय उत्साहात स्वागत करत होते. डोलताश्या व पारंपारिक वाद्यांच्या आवाजाने परिसर भरून गेला होता.