निवडणूक निरीक्षक डॉ.मिश्रा यांनी घेतला अर्जुनी/मोरगाव येथे निवडणूक तयारीचा आढावा

0
31

गोंदिया दि.६ : येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी आज ६ एप्रिल रोजी अर्जुनी/मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूकीच्या दृष्टीने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
कृषि उत्पन्न बाजार समितीत तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमसह नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, अर्जुनी/मोरगावचे तहसिलदार विनोद मेश्राम, सडक/अर्जुनीच्या तहसिलदार उषा चौधरी, नोडल अधिकारी श्री.नाईनवाड, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, नायब तहसिलदार श्री.पाटील उपस्थित होते.
डॉ.मिश्रा यावेळी म्हणाले, मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर मतदारांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात. समाजमाध्यमांवर लक्ष दयावे. चुकीच्या त्यावर कुठल्याही पोस्ट येणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणी मतदानावर बहिष्कार टाकत असेल तर त्यांना भेटून बहिष्कार मागे घेण्याबाबत विनंती करावी. बहिष्कार टाकणे ही चांगली बाब नाही. पोलीस विभागाने निवडणूकीच्या दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हा भाग नक्षलग्रस्त असला तरी शंभर टक्के मतदान कसे होईल यादृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती जास्तीत जास्त करावी. अवैध दारुचा पुरवठा व विक्री या निवडणूकीच्या काळात होणार नाही यासाठी धाडसत्र मोहिम राबवावी असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय अधिकारी श्रीमती सोनाळे म्हणाल्या, जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. या मतदारसंघात आदिवासी, अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग मतदाराचे प्रमाण मोठ्या संख्येने असल्याचे त्यांनी सांगितले.
या विधानसभा क्षेत्रात २९५ गावे येत असल्याचे सांगून श्रीमती सोनाळे म्हणाल्या, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत मतदार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली आहे. मतदार ओळखपत्रे वाटप करण्यात आली आहे. नविन मतदारांची नोंदणी करुन त्यांचे मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज भरुन घेण्यात आले आहे. बीएलओचे व सखी बुथचे वेगळे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या विधानसभा क्षेत्रात काही गावे नक्षलग्रस्त असल्यामुळे या मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत अशी राहणार आहे. ३१ मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.ढोले यांनी निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था चोख राहील यादृष्टीने तयारी केली असून नक्षलग्रस्त भागात शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषि उत्पन्न बाजार समितीत असलेल्या स्ट्राँग रुमला डॉ.मिश्रा यांनी भेट देवून पाहणी केली. कुठल्याही त्रुटी स्ट्राँग रुम व त्या परिसरात राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या. नवेगावबांध येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १९३ आणि १९८ ला भेट देवून पाहणी केली. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रावर कोणत्याही अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्याबाबतच्याही सूचना डॉ.मिश्रा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.