ही निवडणूक देशाच्या विकासाची, सुरक्षेची : मुख्यमंत्री

0
18

तुमसर,,दि.७ एप्रिलः-यावेळची लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या कामांवर देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आहे. देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठ़ी आहे, हे लक्षात घेऊनच मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठ़ी भाजपा-शिवसेना-रिपाई आघाडी उमेदवाराच्या कमळासमोरील बटन दाबून सुनील मेंढे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तुमसर येथील नेहरू मैदानावर शुक्रवारी रात्री झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. चरण वाघमारे,आ. डॉ. परिणय फुके, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे, माजी खा. शिशुपाल पटले,आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- काँग्रेसने ६० वर्षे या देशावर राज्य केले पण जनतेची काय स्थिती केली हे आपण पाहिले आहे. आजीपासून आता नातवापर्यंत सर्वच काँग्रेसवाले गरिबी हटविण्याच्या गोष्टी करीत होते. पण हटली का गरिबी? उलट गरीबच हटला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गरिबांची गरिबी नव्हे तर नेत्यांची गरिबी हटली असेही ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात गरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणार्‍या योजना प्रधानमंत्री मोदी यांनी आणल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- जनधन योजनेतून ३४ कोटी कुटुंबांचे बँकांमध्ये खाते उघडले गेले. या योजनेतून ८० हजार कोटी लोकांच्या खात्यात जमा झाले. स्वच्छ भारत योजनेतून शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले गेले आहे. ५५ टक्के कुटुंबांकडे शौचालय नव्हते. आज ९८ टक्के कुटुंबांकडे शौचालय झाले आहेत. उज्ज्वला योजनेअंतर्गत ७ कोटी कुटुंबांच्या घरात गॅस सिलेंडर पोहोचवले. महिलांचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघाला. सन २०२२ पर्यंत देशात एकही कुटुंंब बेघर राहणार नाही याची योजना आणली. राज्य शासनाने आतापर्यंत राज्यात गरिबांसाठी ५ लाख घरे बांधली आहेत. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे, शेतकर्‍यांना कर्जमाफी, बोनस अशा अनेक योजना मोदी शासनाने गरीब व शेतकर्‍यांसाठी आणल्या आहेत. आतापर्यंत राज्यात ५८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. आघाडी सरकारच्या काळात फक्त ८ हजार हेक्टर सिंचन होत होते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रचंड टीका केली.या सभेत आ. चरण वाघमारे यांनीही आपल्या भाषणातून काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीका केली. उमेदवार सुनील मेंढे यांनीही आपले विचार व्यक्त केले.