पैशांचे आमिष दाखविणे हा लोकशाहीवरच डाका

0
12

नागपूर,दि.08ः- भाजपने लोकांना १५ लाख देऊ केले. काँग्रेसने ७२ हजार देऊ केले आहे. खरेतर, लोकांना पैशांचे आमिष दाखविणे हा लोकशाहीवरच डाका आहे. राजकीय पक्षांचे नेते अशा घोषणा, आश्‍वासने देऊच कसे शकतात? जाहीरनाम्यातील कोणतीच आश्‍वासने, घोषणा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीरनामे केवळ थट्टा बनत आहेत, असा टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष तथा नागपूर लोकसभेचे उमेदवार अँड. डॉ. सुरेश माने यांनी केली.
प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अँड. माने म्हणाले, लोकसभेसारखी महत्त्वाची निवडणूक असतानाही काँग्रेस पक्ष भाजप-शिवसेनेला हरविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. यावरून काँग्रेसने लोकसभा निवडणूक मनावरच घेतली नाही, असेच दिसून येते. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना हरविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विशेषत: काँग्रेस गंभीर नाही. काँग्रेसवाले केवळ मुलांना भाजपमध्ये पाठवून ‘सेट’ करण्यावर भर देत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्षातील दिग्गज नेत्यांची मुले भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. काँग्रेसला भाजप-शिवसेनेला हरवायचे नाहीच. केवळ आपापली मुले भाजपमध्ये पाठवून ‘सेट’ करण्यावर काँग्रेस पदाधिकार्‍यांचा भर आहे, असा आरोपही अँड. माने यांनी यावेळी केला. नाना पटोले नागपुरात कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. पटोले यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांचा विरोध होता. परंतु, तरीही पक्षश्रेष्ठींनी ऐकले नाही आणि ‘ना-ना’ करीत नानांना नागपुरात आणलेच. २00६ च्या खैरलांजी प्रकरणात नानांचे नाव आहे. एवढेच नव्हे तर, भंडारा जिल्हय़ातील एका दलित मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींना नानाने पाठिशी घातले आहे. याशिवाय नानाच्या छावा संग्राम परिषदेने त्यांच्याच गावातील बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे, याची आठवणही अँड.माने यांनी करून दिली. त्यामुळे भाजपा व कॉंग्रेस या दोन्ही पक्षाला नाकारून ‘बीआरएसपी’च्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन अँड. माने यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला अजयकुमार सिन्हा, प्रा. झेड. आर. युथकुवर, अँड. शर्मा, राजेश बोरकर आदी उपस्थित होते.