मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे- जिल्हाधिकारी शेखर सिंह

0
18

गडचिरोली दि.8:- मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत असून 11 एप्रिल रोजी  मतदानाच्या दिवशी मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे  मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना निळ, ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, श्री. पडघन, नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, सहाय्यक करपे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘स्विप’ कार्यक्रमांतर्गत  मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.  यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार जागृती दिवसापासूनच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.  याअंतर्गत विविध स्पर्धा, पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली व इतर उपक्रमांचा समावेश आहे.  मागील निवडणुकीत कमी मतदान झालेल्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नविन 22 हजार युवा मतदार आहेत.    महिला व युवा मतदारांनी मतदानासाठी मोठया संख्येने पुढे येण्यासाठी त्यांना विशेषत्वाने आवाहन करण्यात येत आहे.  महाविद्यालयामार्फत कॅम्पस ॲम्बॅसिडर यासंकल्पने अंतर्गतही मतदार जागृती करण्यात येत आहे. सेल्फी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत विविध पारितोषिके देण्यात येणार आहे. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका मार्फतही मतदार जागृतीचे कार्यक्रम गावागावात घेण्यात येत आहेत.

मतदान जागृतीसाठी पोस्ट कार्ड

मतदारांमध्ये  जागृतीसाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून मतदारांना मतदानाचे महत्व पटावे यासाठी  संदेश देणारे पोस्ट कार्ड मराठी, बंगाली, माडीया व तेलगु या भाषेतून  तयार करण्यात आली आहे.  साडेसात लाख मतदारांना ही पोस्ट कार्डस् पाठविण्यात येत आहे. यामध्ये मतदानाची वेळ व अन्य माहिती यांचा समावेश आहे.

ईव्हिएम तसेच व्हिव्हिपॅट संदर्भातही जनजागृती करण्यात येत आहे.  871 ठिकाणी या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.  सुमारे 47 हजार लोकांनी  याची चाचणी केली आहे.  मतदानासंदर्भातील दुसरे प्रशिक्षणही पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

निवडूक आयोगाने संकेतस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास कोणती 11 ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येईल याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहे.  त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे.  परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती याप्रमाणे- 1. पासपोर्ट, 2.वाहन चालक परवाना, (ड्रायव्हिंग लायसन्स) , 3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, (केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादीत कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), 4. छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, 5. पॅनकार्ड, 6. एनपीआर अंतर्गत आरजीआय व्दारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, 7. मनरेगा कार्यपत्रिका, 8. कामगार मंत्रालयाव्दारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, 10. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, 11. आधारकार्ड  या ओळखपत्रांचा यामध्ये समावेश आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.