ही निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची : नितीन गडकरी

0
13
-अर्जुनी मोर येथील जाहीर सभेत प्रतिपादन

 
गोंदिया,दि. ८ पाकिस्तानने तीन वेळा युद्धात पराभूत झाल्यामुळे भारताविरुद्ध छुपे युद्ध सुरू केले आहे. यासाठी राष्ट्रद्रोही व विघटनवादी शक्तींना पाठिंबा देऊन देशात आतंकवाद पसरवण्याचा पाकिस्तानचा मनसुबा आहे. यूपीए सरकारच्या काळात २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला असताना तत्कालीन सरकारने केवळ निषेधाचे औपचारिकता पूर्ण केली होती. परंतु ,भाजपप्रणित मोदी सरकारने केवळ निषेध न करता त्यांच्याच भूमीत जाऊन आतंकवादाचा नायनाट करताना दोनदा सर्जिकल स्ट्राईक केली. प्रथम राष्ट्र व नंतर पक्ष हेच भाजपप्रणित एनडीएचे मुख्य धोरण असल्याने ही निवडणूक राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मजबूत सरकार की मजबूर सरकार याचा निर्णय जनतेला घ्यायचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी केले.
ते ८ एप्रिल रोजी भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ अर्जुनी मोर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. सभेला पालकमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे, भाजप गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आ. डॉ. परिणय फुके, आ. रामचंद्र अवसरे, माजी आ. हेमकृष्ण कापगते, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश जायस्वाल, पंस सभापती अरविंद शिवणकर, लायकराम भेंडारकर, नामदेव कापगते तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. 
पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जोडी हिरवे खाणारी आहे. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि आता राहूल गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला. सर्वसामान्यांची तर गरीबी दूर झाली नाही, परंतु, या जोडीची व त्यांच्या चेल्याचपाट्यांची गरीबी चांगलीच दूर झाली. या जोडीच्या चुकीच्या धोरणामुळेच गरीब हा गरीब होत गेला, बेरोजगारांची संख्या वाढत गेली. या जोडीने शिक्षणाचे व्यापारीकरण केल्यानेच गरीब उच्चशिक्षणापासून दुरावला आहे. अशा अनेक मार्गाने हे धनदांडगे झाले व आज गरीब, शेतकरी, पीडित, वंचितांचे शुभचिंतक म्हणून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. 
पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले, गत पाच वर्षात भाजप सरकारने सिंचनाकरिता राज्याचे २६ प्रकल्प घेतले व २० हजार कोटीचा निधी दिला. ४० हजार कोटीतून १३४ प्रकल्पचे काम सुरु आहे. त्यामुळे सिंचन ५० टक्क्यांवर जाईल. १७ लाख कोटीचे रस्त्याची कामे केली असून ते रस्ते दोनशे वर्षे टिकतील. पवनी ते मौदा असा जलमार्ग पोर्टतयार करुन माल वैनगंगा मार्गे आंध्रला पाठविण्याची योजना आहे. बुद्ध सर्किट नावाने १० हजार कोटींची कामे केली. राम, जानकी सर्किट पूर्ण केले, आम्ही जातीपातीचे राजकारण केले नाही. १२ हजार कोटी खर्च करुन बद्रीनाथ केदारनाथ रास्ता बांधला. पुढच्या वर्षापासून तुम्ही दर्शनाला जाऊ शकता. ई-रिक्शा आणल्याने माणूस माणसाला ओढण्याचे काम बंद झाले. ८० वेळा घटना मोडण्याचे काम काँग्रेसवाल्यानी केले आणि बोंबा आमच्या नावाने ठोकत आहेत. पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून तनसापासून इंधन तयार केल्यास ५५ चा सिएनजी व ८५ चा डिझेल असा फरक पडणार आहे. आज पेट्रोल मध्ये १० टक्के इथेनॉल मिसळला आहे. २ जिल्ह्यात दहा हजार तरुणांना रोजगार देऊ. ६ हजार टन क्षमतेचा  साखर कारखाना करु, असे आश्वासन देत गाव, गरीब, मजूरचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला साथ द्या. सुनील मेंढेची मी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गॅरंटी घेतो. ५ वर्षात क्षेत्राचा विकास घडवून आणू असे अभिवचन यांनी यावेळी त्यांनी दिले.