लोकशाहीच्या सणाला जिल्हाधिकाऱ्यांचे निमंत्रण

0
22

वाशिम, दि. ०९ : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. आता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक मतदारांना लोकशाहीच्या सणाला म्हणजेच मतदानाला येण्याचे निमंत्रण देणार आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल २०१९ रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहे. याकरिता जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, मोटारसायकल रॅली, स्टिकर्स, घंटागाडीवरील जिंगल्स, बॅनरद्वारे मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.

नवमतदार, महिला मतदार आणि दिव्यांग मतदार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी घरोघरी जावून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा मतदारांना मतदानाचे निमंत्रण दिले जाणार आहे. सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्यामार्फत मतदारांना मतदार चिट्टी (व्होटर स्लीप) वाटप करण्यात येत आहे. या मतदार चिट्टी सोबतच जिल्हाधिकाऱ्यांचे निमंत्रणही मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

मतदान हे केवळ राष्ट्रीय कर्तव्य ती आपली जबाबदारी देखील आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराचे मत महत्वाचे आहे. आपण सुजाण नागरिक व जागरूक मतदार आहात. मतदानाच्या दिवशी आपण व आपल्या कुटुंबातील अन्य पात्र मतदार नातेवाईक, मित्रपरिवारासह आपण मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी निमंत्रण पत्रातून केले आहे.