मतदार जागृती करणाऱ्या हावडा-अदी एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

0
13

गोंदिया दि.९.: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती करण्यासाठी हावडा येथून ८ एप्रिल रोजी प्रारंभ झालेल्या हावडा-अदी एक्सप्रेसचे आज ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावर आगमन झाले असता जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रेल्वेतील प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना गो फॉर वोट हे पॉम्पलेटस् दिले. सर्वांनी या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असा आग्रह त्यांनी यावेळी केले. यावेळी रेल्वेतील काही प्रवाशांनी वोटर्स सेल्फी पॉईंट समोर उभे राहून सेल्फीसुध्दा काढली.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी हावडा-अदी एक्सप्रेसचे लोको पायलट एच.डी.मोटघरे यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देवून स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी या रेल्वेला औपचारीकरित्या हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, रेल्वेचे स्टेशन मास्तर एन.आर.पती यांचेसह प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी, रेल्वे व रेल्वे पोलीसचे अन्य अधिकारी, नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.