लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रकाशन

0
177

गोंदिया दि.१० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने एप्रिल-मे २०१९ या संयुक्त महिन्याच्या लोकराज्य मासिकाच्या लोकराज्य निवडणूक २०१९ या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते १० एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
लोकराज्यच्या या विशेषांकाचे अतिथी संपादक म्हणून अवर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार हे आहेत. या विशेषांकामध्ये लोकशाहीचा महोत्सव, १९५० क्रमांकाची हेल्पलाईन, मतदार जागृती अभियान, विश्वास पात्र आणि पारदर्शक म्हणून मतदान यंत्राला प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्राची जोड, निवडणूक प्रशिक्षण मतदानासाठी आवश्यक दस्ताऐवज, दिव्यांग मतदारांना मदत, पेडन्युजवर करडी नजर, समाज माध्यमांवरील खलनायक, सी-व्हीजील सदैव दक्ष असलेला तिसरा डोळा, आदर्श आचारसंहिता, राजकीय जाहिराती, निवडणूक प्रचार मोहिम, निवडणूका बदलते तंत्र याबाबतच्या माहितीसह विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश यामध्ये आहे.
सन २००९ आणि सन २०१४ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेले मतदान मुख्य निवडणूक आयुक्त, अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी, लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक या अंकात नमुद केले आहे. हा अंक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, रुम नं. २५, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.