नक्षलवाद्यांचा भीषण हल्ला, तीन जवान जखमी

0
16
file photo

गडचिरोली,दि.11ः- आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यासाठी आज मतदान सुरु असतानाच जिल्ह्यात दुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात हिंसक घटनांमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे आले. सकाळी कसनसूर पोलीस केंद्राच्या हद्दीतील वाघेझरी येथे भूसूरंग स्पोट घडविल्यानंतर पुन्हा आज दुपारी मतदान संपल्यानंतर  हेडरी पोलीस स्टेशनअंतर्गत कोरसलगोंदी या मतदार केंद्रावरील कर्मचारी आणि पोलीस मतदान प्रक्रिया पूर्ण करून ३.१५ वाजता परत हेडरी येथील बेस कॅम्पवर येण्यासाठी पायी निघाले असता गावाजवळच भूसुरुंगाचा स्फोट झाला. त्यात एक जवान जखमी झाला. या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी एटापल्ली तालुक्यातच गट्टा (जांभिया) येथे मतदान केंद्राकडे जात असलेल्या कर्मचा-यांच्या बससमोरील पोलीस कर्मचा-यांना लक्ष्य करून भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त असताना या हिंसक घटनांचे गालबोल कसे लागले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे

एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील वाघेझरी गावच्या शाळेजवळ नक्षलवाद्यांनी सकाळी 11च्या सुमारास भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. गेल्या निवडणुकीपर्यंत त्या शाळेत मतदान केंद्र राहात होते. परंतु अशा घातपाती कारवायांची शक्यता पाहून यावेळी मतदान केंद्र अंगणवाडी केंद्रात ठेवल्याने त्या स्फोटात कोणतीही हाणी झाली नाही. या स्फोटानंतरही गावात मतदान सुरळीत सुरू होते. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ असल्यामुळे सकाळी ७ वाजतापासून नागरिकांनी मतदानासाठी गर्दी करणे सुरू केले होते. गडचिरोली शहरातील काही केंद्रांवर मतदानाची वेळ संपली तरी गर्दी कमी झालेली नव्हती. दुर्गम भागातील काही ठिकाणच्या अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने मतदारांची तारांबळ उडाली. कडक उन्हामुळे मतदान यंत्र मंद गतीने काम करत असल्याने भर उन्हात मतदारांना रांगेत ताटकळत राहावे लागले.