जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

0
10
????????????????????????????????????

वाशिम, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ करिता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या दोन विधानसभा क्षेत्रात आज मतदान झाले. या क्षेत्रात येणाऱ्या ७१७ मतदार केंद्रांसह १३ सहाय्यकारी मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी वाशिम शहरातील मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्वप्रथम राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथील मतदान केंद्रांना भेट दिली. याठिकाणी दिव्यांग मतदारांच्या मतदानाची टक्केवारी, एकूण मतदान टक्केवारी याची माहिती घेतली. तसेच मतदान अधिकारी यांच्याशी चर्चा करून सकाळपासून सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. याठिकाणी येणाऱ्या दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या गाईड्स सोबत संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

शिवाजी शाळा येथेअसलेले मतदान केंद्र क्र. २२८ चे संपूर्ण व्यवस्थापन महिलांच्या हाती देवून ‘सखी’ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी याठिकाणी उपस्थित महिला मतदान अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतदान प्रक्रीयेबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बकालीवाल विद्यालय येथील मतदान केंद्र क्र. २३१ या सखी मतदान केंद्रासह एस.एम.सी. महाविद्यालयातील मतदान केंद्रांचीही पाहणी केली व तेथील मतदान केंद्र अधिकाऱ्यांकडून मतदान प्रक्रियेशी संबंधित माहिती जाणून घेतली.