गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सरासरी 69 टक्के मतदान

0
16

गडचिरोली दि 11-: 12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात रात्री 9.00 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सरासरी 69 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सकाळी 7.00 वाजल्यापासून सर्वत्र शांततेत मतदानास सुरुवात झाली.  सर्व मतदान केंद्रावर सुरुवातीला मॉकपोल घेण्यात आले.  95 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले.एटापल्ली तालुक्यातील कसनसुर जवळील  मौजा  वागेझरी जवळ आईडी ब्लास्ट, गट्टा जांबीया गावाच्या जवळ तसेच पुरसलगोंदी गावाच्या जवळ  झालेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात दोन जवान जखमी झाल्याची घटना घडली. या घटना वगळता  जिल्हयात व मतदारसंघात  अन्यत्र शांततेत मतदान पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत  देण्यात आली आहे.

गडचिरोली येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मतदान केंद्रावर खासदार अशोक नेते व त्यांच्या पत्नी अर्चना नेते यांनी मतदान केले.तर जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता भांडेकर यांनी चामोर्शी येथे तर माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आञाम यानी कुटूंबियासह अहेरीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.काॅग्रेस नेते प्रा.एन.डी.किरसान यांनी आमगाव मतदारसंघातील रिसामा मतदान केंद्रावर मतदान केले.काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यानीही गडचिरोलीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीकरीता जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षकांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीत भाजपचे अशोक नेते, काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी, वंचित बहुजन आघाडीचे डॉ.रमेशकुमार गजबे, बसपाचे हरिचंद्र मंगाम आणि आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे देवराव नन्नावरे या पाच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त झाले. येत्या २३ मे रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणची मतमोजणी होणार आहे. त्यामळे मतदारांना निकालासाठी तब्बल सव्वा महिना वाटप पहावी लागणार आहे.
सकाळी ७ वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. परंतू शहरी भागात ३ वाजताही मतदारांच्या रांगा लागलेल्या असल्याने त्यांना मतदान केंद्राच्या प्रांगणात घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. त्यांचे मतदान पूर्ण होण्यास ५ वाजले. विशेष म्हणजे नवमतदारांमध्ये यावेळी मतदानाचा विशेष उत्साह दिसून आले. पहिल्यांदा मतदान करताना ते चांगलेच उत्साही दिसत होते.
गडचिरोलीतील सखी मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात कर्मचाऱ्यापासून तर केंद्राधिकारी व इतर कर्मचारी महिलाच होत्या. 

कोरची : तालुक्यातील संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ऐनवेळेवर बदलविण्यात आले. त्यामुळे मतदारांची चांगलीच गैरसोय झाली. तालुक्यातील भीमनखुजी मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने मतदानाची पार्टी पाठविण्यात आली होती. पण सदर केंद्र अतिसंवेदनशील असल्याच्या कारणावरून १५ किमी अंतरावरील ग्यारापत्ती येथे केंद्र हलविण्यात आले. नाडेकल येथील मतदान केंद्र १४ किमी अंतरावरील ढोलडोंगरी येथे हलविले. लेकुरबोडीचा मतदान केंद्र ३किमी अंतरावरील नवेझरी येथे हलविले. आलोंडीचा मतदान केंद्र ५ किमी अंतरावरील पिटेसूर येथे हलविले. गोडरीचा केंद्र ७ किमी अंतरावरील सोनपूर येथे हलविले. सावली येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र प्रभूदास लाडे यांच्या घरी हलविण्यात आले. त्यांच्या घरी नुकताच लग्नाचा कार्यक्रम पार पडला होता. लग्नाच्या मंडपातच मतदान केंद्र सुरू केले. सुरक्षेच्या कारणास्तव सदर मतदान केंद्र हलविण्यात आले. मात्र मंडपात कोणती सुरक्षा होती, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कैमुल येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्र सुदाराम मेश्राम यांच्या घरी हलविले. सावली व तैमुल येथील नागरिकांना विचारपूस केली असता, यापूर्वीच्या निवडणुका शाळेतच झाल्याचे सांगितले.
घोट : भाडभिडी मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या नियोजित वेळेवर पोहोचल्या. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात होणार होती. मात्र ईव्हीएमचे कनेक्शन लूज होते. झोनल आॅफिसरने मशीन बदलवून दिल्यानंतर ९ वाजताच्या दरम्यान मतदान सुरू झाले. भाडभिडी केंद्रावर बिलासपूर, भाडभिडी, राजूर बू., राजूर खुर्द, जानाळा, जंगमपूर, लभानतांडा या सात गावांचा समावेश होता. या मतदान केंद्रांवर एकूण १ हजार ७५ मतदार होते.