गट्टा मतदान केंद्रावर ४५.०५ टक्के मतदान

0
24

गडचिरोली,दि.१५: एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया) मतदान केंद्रावर चार गावांतील नागरिकांचे मतदान आज घेण्यात आले. दुपारी ३ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तेथे केवळ  ४५.०५ टक्के मतदान झाले.गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक ११ एप्रिलला पार पडली. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया गावाजवळ नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविल्याने वटेली,गर्देवाडा, पुस्कोटी व वांगेतुरी या गावांचे मतदान झाले नव्हते. आज सकाळी ७ ते दुपारी ३ वाजतापर्यंत गट्टा(जांभिया) येथील मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली. तेथे ४५.०५ टक्के मतदान झाले. एकूण २६८६ मतदारांपैकी १२१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या क्षणापर्यंत परिसरात कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, नक्षल दहशतीचे सावट नागरिकांमध्ये असल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाल्याचे बोलले जात आहे. विशेषत: महिला मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडल्या नाहीत. १३९८ पुरुष मतदारांपैकी ७८९ जणांनी मतदान केले, तर १२८८ महिला मतदारांपैकी केवळ ४२१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.दरम्यान, यापूर्वी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात ७२.०२ टक्के मतदान झाले होते. परंतु आता गट्टा मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी बघता एकूण मतदानात घट होऊन ते ७१.९८ टक्के झाले आहे.