वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
9

ब्रम्हपुरी,दि.18ः- तालुक्यात वाघाचा हैदोस सुरू असून बुधवारी नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. गीता गोपाल गावतुरे (४0) असे मृत महिलेचे नाव असून ही महिनाभरातील तिसरी घटना आहे.
गीता गावतुरे ही महिला नेहमीप्रमाणे गावातील इतर ९ महिला व एक पुरुष यांच्यासोबत सकाळीच मेंडकी गावापासून ४ किलोमीटर अंतरावर खडीमुडा कोरेगाव रीठ कक्ष क्र. १५७ या जंगलात मोहफुल गोळा करायला गेली होती. बुधवारी सकाळी १0: ३0 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने तिच्यावर हल्ला केला. त्यावेळी तिच्या सोबतच्या महिला व एक पुरुष तेथेच उपस्थित होते. ही घटना पाहून त्या सर्वांनी आरडाओरड केली. परंतु वाघ तिला सोडायला तयार नव्हता. तेव्हा सर्वांनी हिंमत करून वाघाला परतवून लावण्याचा जोरदार प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्यांनी वाघाच्या तावडीतून जखमी महिलेचे पाय जोराने ओढत तिला सोडविले. आरडाओरडीने वाघ पळाला. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती वनविभाग व पोलिस विभागाला देऊनही कोणताही अधिकारी व कर्मचारी १२ वाजतापयर्ंत आला नाही. त्यामुळे या परिसरातील जनतेमध्ये वनविभागाबद्दल तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे.गीता गोपाल गावतुरे ही महिला विधवा, निराधार, गरीब शेतमजूर असून तिला दोन अपत्य आहेत. आई गेल्याने ही पोरं पूर्णत: पोरकी झाली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे .घटना घडल्यानंतरही तब्बल दोन तास झाले तरीही वनविभाग व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित न झाल्याने वनविभागाप्रति लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.