विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

0
10

नितिन लिल्हारे/मोहाडी,दि.18ः- लग्नमंडपातील खांबाला वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्या खांबाला हात लावताच एक अल्पवयीन मुलगा ठार झाला. ही घटना मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा येथे मंगळवारी रात्री घडली.हर्षल उर्फ निखिल अनिल कुंभलकर (१५) रा. डोंगरगाव असे मृत मुलाचे नाव आहे. तो सुलोचनादेवी पारधी विद्यालय मोहाडी येथे इयत्ता दहावीत शिकत होता. परीक्षा संपल्यावर शाळेला सुट्टी असल्याने तो शिवशंकर सेलोकर यांच्या कॅटरिंग सेंटरमध्ये काम करण्यासाठी जात होता.
मंगळवारी सायंकाळी भिकारखेडा येथे लग्न समारंभात तो कॅटरिंगचे काम करण्यासाठी गेला होता. लग्नात पाहुण्यांचे जेवन उरकल्यानंतर कॅटरिंगचे काम करणार्‍या मुलांनी जेवण केले. तेवढय़ात जोराचे वादळ आल्याने वीज पुरवठा बंद झाला. हर्षल हा मंडपाच्या लोखंडी खांबाला हात धरून मित्रांशी बोलत असताना थोड्याच वेळात वीज आली असता त्याला विजेचा जोराचा धक्का लागला व जागीच गतप्राण झाला. त्याला त्वरित मोहाडीच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेने डोंगरगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जोराचा वादळवारा आल्याने मंडपात करण्यात आलेली रोषणाईचे वायर तुटून त्याचा स्पर्श लोखंडी खांबाला झाला असावा व लोखंडी खांबात वीजप्रवाह आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद मोहाडी पोलिस स्टेशन येथे करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे करीत आहेत.