अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

0
21

सालेकसा,दि.19ः-येथील तहसील कार्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता पिण्याचे पाणी अस्वच्छ टाकीतून येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या तहसील कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील ९२ गावांचा लेखाजोखा आहे. त्यामुळे कामानिमित्त तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांची दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, या कार्यालयात सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. येथील मुत्रीघरात दुर्गंधी पसरली आहे. र्खे खाऊन थुंकणारे कर्मचारी आणि नागरिकांनी तर स्वच्छतागृहाला जणू थुंकदानीच समजले आहे. शौचालयात पाण्याची व्यवस्था नाही.
दरम्यान, नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, याकरिता नळ लावले आहेत. मात्र, त्या नळांना ज्या टाकीतून पाणी पुरवले जाते त्या टाकीची अवस्था अतिशय वेगळी आहे. अस्वच्छतेने बरबटलेल्या टाकीतून नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तालुका प्रशासनाने दखल घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा व स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे