मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी स्किल लॅब सज्ज

0
9

गरोदरपणात तसेच प्रसूतीदरम्यान उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर प्रशिक्षित मनुष्यबळाच्या सहाय्याने नक्की मात करता येईल. या दृष्टीकोनातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुसज्ज अशी स्किल लॅब (कौशल्य प्रयोगशाळा) आकारास आली आहे. विदर्भातील पहिली व महाराष्ट्रातील दुसरी अशी ही स्किल लॅब आहे. माता, नवजात बालके तसेच किशोरवयीन वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्य सेवांसंबंधी कौशल्यामध्ये व कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे हा या स्किल लॅबचा मुख्य उद्देश आहे. या स्किल लॅबचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ आदी आरोग्य सेवेतील विविध घटकांना होत आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील 1340 चौरस फुटांमध्ये विविध उपकरणे व औषधांनी ही स्किल लॅब सज्ज आहे. प्रसूतीपूर्व सेवा व नोंदणी, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात सेवा, नवजात बालकाची तातडीची सेवा, कुटुंब कल्याण सेवा, संसर्ग प्रतिबंध सेवा अशा पाच विभागांचा स्किल लॅबमध्ये समावेश आहे. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत तपासणीसाठी उपयोगी पडणाऱ्या वैद्यकीय साधनसामग्रीचे प्रदर्शन येथे भरवले असून त्याद्वारे डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफला प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी माहिती फलक, विविध प्रकारचे मॉडेल आदींचा उपयोग केला जातो. या साहित्याबरोबरच प्रशिक्षणादरम्यान दृकश्राव्य माध्यमांचाही वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच मेळघाटसारख्या दुर्गम भागातील मातामृत्यू, बालमृत्यू तसेच कुपोषण आदी समस्यांवर मात करण्यासाठी स्किल लॅबमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा विशेष फायदा होणार आहे.

डिसेंबर 2014 मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात स्किल लॅब सुरु करण्यात आली. स्किल लॅबमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाल्यापासून रुग्णालयात होणाऱ्या बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. सन 2014 च्या जानेवारी व फेब्रुवारीमध्ये एकूण 64 बालमृत्यू झाले. परंतु सन 2015 च्या जानेवारी व फेब्रुवारीमध्ये एकूण 16 बालमृत्यूची नोंद आहे. म्हणजेच बालमृत्यूचे प्रमाण 64 वरुन 16 वर आले आहे. सन 2014 च्या जानेवारी व फेब्रुवारीमध्ये मिळून एकूण 3 मातामृत्यू झाले, तर सन 2015 च्या सुरुवातीपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत एक मातामृत्यू झाला आहे. सध्या या स्किल लॅबमध्ये प्रसूती कौशल्य प्रशिक्षण, एमव्हीए-एमटीपी (वैद्यकीय गर्भपात), आययूडी (संतती नियमन शस्त्रक्रिया प्रशिक्षण), बीईएमओसी, मिनी लॅप आदी विविध प्रकारच्या प्रशिक्षण बॅचेस सुरु आहेत. स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरुण यादव तसेच वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जामठे, अधिसेविका रुपमाला घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल लॅबमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या या स्किल लॅबमध्ये प्राथमिक स्वरुपात प्रशिक्षण दिले जात असून लवकरच स्किल लॅबमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ व दोन सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांच्याद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्किल लॅब उभारणीसाठी प्रशासकीय अधिकारी एस.एस.नेमाडे, वरिष्ठ लिपिक पी.एन.महाजन आदी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

-सचिन ढवण
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती