पाणलोटामुळे बासीपारच्या शेतकऱ्यात आली आर्थिक सुबत्ता

0
24

शेती करीत असतांना आवश्यक असलेले पाणी व उत्कृष्ट माती असणे गरजेचे आहे. शेतीमध्ये दर्जेदार पीक घेण्यासाठी पाणी व माती हे घटक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. हा उद्देश लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाच्या कामाला अग्रक्रम दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील बासीपार या गावात गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत मृदसंधारण व पाणलोट व्यवस्थापनाची कामे करण्यात आली.
गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी शासकीय यंत्रणा व शासकीय योजनेच्या प्राप्त निधीतून करण्यात आली. बासीपार येथील ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अनुसयाबाई यांच्या शेतीत ओघंडीवर माती नाला बांधाचे काम करण्यात आले. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध झाला. या पाण्याचा उपयोग शेतीच्या संरक्षीत सिंचनासाठी करता येणे शक्य झाले. एप्रिल महिन्यातील तप्त उन्हात पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने धानाच्या पिकात 20 क्विंटल प्रती हेक्टर वरुन 40 क्विंटल प्रती हेक्टर पर्यंत वाढ झाली. याच पाण्याचा उपयोग पशू व पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी देखील होऊ लागला.

बासीपारचे शेतकरी उरकुडा जोशीराम धुर्वे यांनी सुवर्णा या जातीचे भात पीक घेण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी याच शेतीत ओलिताअभावी खरीप भात सुवर्णा या जातीचे उत्पन्न फार कमी म्हणजे हेक्टरी 25 क्विंटल व्हायचे. परंतू कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने नाला बांधकाम केल्यामुळे उत्पादनात भर पडली. हेक्टरी तब्बल 55 क्विंटल भात पीक त्यांनी घेतले.

या योजनेअंतर्गत ‘उत्पन्न वाढीचे तंत्रज्ञानाबाबतचे मार्गदर्शन’ योग्य वेळी लाभल्यामुळे तसेच भात नर्सरीकरीता वेळेवर गांडुळ खत गावातूनच उपलब्ध झाल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. शासनाची ही योजना समस्त बासीपारच्या शेतकरी बांधवाच्या हिताची ठरल्याचे मत शेतकरी लरकुडा धुर्वे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बांधकाम केल्यामुळे शेतकरी सोहनलाल रामभाऊ ब्राम्हणकर यांनी हेक्टरी 48 क्विंटल धानाचे पीक घेतले. तर लोबीचंद नारायण मेंढे यांच्या शेतात शेततळे केल्यामुळे त्यांनी 24 क्विंटल जास्त भाताचे पीक घेतले.
मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची कामे केल्यामुळे शेतकऱ्यांच्या संरक्षित ओलित क्षेत्रात वाढ झाली आहे. जमिनीची धूप थांबून गाळ साचल्यामुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढली आहे.

पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा घेतल्यामुळे शेतकरी बांधवांचा सहभाग वाढला. नाला, सिमेंट बंधारे व माती नाला बांधाचे उपचार केल्यामुळे भूगर्भात पाण्याची पातळी व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली व पिकांना योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ लागले. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या यशामुळे बासीपारच्या शेतकऱ्यात आर्थिक सुबत्ता येण्यास मदत झाली.
या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पिकांची लागवड, उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब, पिकांत फेरपालट, सुधारित बी-बियाण्यांचा वापर शेतकरी बांधवानी केला. शासनाद्वारे आयोजित शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व शेतीशाळेतील मार्गदर्शनामुळे शेतकरी बांधवांचा निश्चितच आर्थिक विकास झाला आहे.

विवेक खडसे,जिल्हा माहिती अधिकारी,गोंदिया