विधानसभेत ऊस पेटला, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

0
20

मुंबई- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात आज ऊसप्रश्नी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यामुळे विधानसभा वारंवार म्हणजे तब्बल 5 वेळा तहकूब झाली. विरोधी पक्षांतर्फे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी उसाच्या प्रश्नावर सरकारी अनास्थेवर प्रकाशझोत टाकला. शुक्रवारीही अजित पवार व जयंत पाटील यांनी ऊसदरावरून विधानसभेत सरकारविरोधात राळ उठवली होती. आजही सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाऊ व हा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. पण विरोधकांचे समाधान झाले नाही. अखेर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब करण्यात आली.

साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना वा-यावर सोडणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी ऊस दराबाबत समाधानकारक तोडगा काढून निश्चित अशी घोषणा करू असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळाच्या बाहेर विरोधकांच्या आरोपानंतर पत्रकारांना सांगितले.आज विधानसभा सभागृहात न भूतो न भविष्यति असा गोंधळ सत्तारूढ पक्षांकडून घालण्यात आला. ज्यांच्यावर सभागृह चालविण्याची जबाबदारी असते, त्यांनीच सभागृहात गोंधळ घातला. गृह तसेच इतर विभागांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही तयार होतो. मात्र कोणतीही चर्चा न करता या मागण्या मंजूर करण्यात आल्या. चर्चा झाली असती तर गृह विभागाची लक्तरे आम्ही टांगली असती, म्हणून हा गोंधळ घालण्यात आला. चर्चेशिवाय मागण्या मंजूर करणं हे दुर्दैवी आहे, असेही जयंत पाटील यांनी टीका केली आहे.