नारायण राणे लवकरच भाजपात दिसतील – ओवेसींचे मुंबईत भाकीत

0
22

वृत्तसंस्था
मुंबई- काँग्रेसला मुस्लिमांचे काहीही देणे-घेणे नाही. तसे असते तर मुस्लिम बहुल वांद्रे (पूर्व) मतदारसंघात काँग्रेसने नसीम खान किंवा अमिन पटेल यांना तिकीट दिले असते. मात्र, काँग्रेसने भाजपमध्ये जाऊ पाहणा-या नारायण राणेंना तिकीट दिले आहे. त्यामुळेच एमआयएम या पोटनिवडणुकीत उतरले आहे. काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला असता तर एमआयएमने ही निवडणूक लढविलीच नसती अशी दर्पोक्ती एमआयएम पक्षाचे नेते व आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मुंबईत केली.
शिवसेनेचे अंगण मानले जात असलेल्या वांद्रे (पूर्व) पोटनिवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे.रविवारी वांद्रेत एमआयएम पक्षाची जाहीर सभा झाली. यात पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसींनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंवर सडकून टीका केली. शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएममध्ये तिरंगी लढत होत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला, राणेंसारखा ताकदीचा नेता व सुमारे लाखभर मुस्लिमांची मते असल्यामुळे या तीनही पक्षात जोरदार चुरस आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले, या मतदारसंघात मुस्लिमांची मोठी लोकसंख्या आहे. काँग्रेस आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो असे सांगतो. मग येथे मुस्लिम उमेदवार त्यांना मिळाला नाही का?. काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला असता तर एमआयएम निवडणुकीच्या रिंगणातच उतरली नसती. 11 एप्रिलच्या पोटनिवडणुकीनंतर येथे एमआयएमचा उमेदवार विजयी झालेला दिसेल. काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंना त्यांचा पक्षच नेस्तनाबूत करेल. आणखी एका पराभवामुळे राणे सैरभैर होतील. त्यानंतर राणे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसह दिल्लीतील नेत्यांवर आगपाखड करतील व त्यांनीच माझा पराभव घडवून आणला असे सांगत फिरतील. हे सर्व झाल्यानंतर राणे काही दिवसातच भाजपमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोटही ओवेसी यांनी केला.