पोलीस महासंचालक आपल्या चमूसह जाणार घटनास्थळी;शहीद झालेत ‘हे’ १६ पोलीस कॉन्स्टेबल

0
65

गोंदिया/मुंबई,दि.01 – गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली ३६ वाहने जाळली. तसेच आज दुपारच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती पत्रकार परिषदेत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिली.केद्रांतून सर्वप्रकारची मदत मिळत आहे. पोलीस महासंचालक म्हणून मी आणि आमची टीम या ठिकाणी जाणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक जयस्वाल यांनी दिली.भंडारा जिल्हयातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी/मोठी येथील पोलीस शिपाई दयानंद शहारे व लाखनी निवासी भूपेश पांडुरंग वालोदे शहीद झाले.हे आज झालेल्या भुसुरुंगस्पोटात शहीद झाले असून गावात एकच स्मशानशांतता पसरली आहे.शहिद जवानांचे पार्थिव कधी येते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.शासकीय इतमामात उद्या गुरुवारला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

अडीच तासात जेवढी माहिती आमच्यापर्यंत आली ती आपल्यासमोर मांडत आहे. आम्ही कायमच दक्ष होतो. आमच्याकडे निवडणूक काळात अशा घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती होती, मात्र तसे काही झाले नाही. ही घटना दुर्दैवी आहे, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहू. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड करू. जवान या भागातून जात असताना सर्व तयारी केली होती. त्यांच्याविरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत. १५ जवान शहीद झाले आणि एक वाहन चालकाचा मृत्यू झाला. खुराडा पोलीस ठाण्याकडे जात असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. कुरखेडा पोलिसांचे हे पथक होते. नक्षलवाद्यांचा भ्याड हल्लाच म्हणावा लागेल असे पोलीस महासंचालक म्हणाले. आज १२. ३० वाजता क्विक अ‍ॅक्शन टीम (क्यूआरटी) वाहनातून प्रवास करत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला केला अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यात शहीद झालेल्या जवानांची नावे पुढील प्रमाणे आहेत.दयानंद सहारे(लाखांदूर), अग्रमन रहाते, सर्जेराव खाडे, किशोर बोबटे, संतोष चव्हाण, राजू गायकवाड, लक्ष्मण कोडपे, साहुदास माडवी, नितिन घोरमारे, पुरणशाह डुगा, प्रमोद भोयर, तौफिक शेख, अमृत भदाडे, योगेश हलामी, भुपेश वालादे(लाखनी), सोमेश्वर सिंहनाथ (खासगी चालक, रा. कुरखेडा) अशी या हल्ल्यात मृत झालेल्या १६ जणांची नावे आहेत.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी या हल्ल्यात 15 जवान आणि गाडीचा चालक शहीद झाल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच दहशतवाद्यांचं कंबरडं सुरक्षा यंत्रणांनी मोडत असल्यानंच त्यांनी जवानांना लक्ष्य केल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- महाराष्ट्र दिनीच महाराष्ट्रातल्या गडचिरोलीतल्या कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात नक्षलींनी जवानांची गाडी उडवून दिली, या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान  ट्विट करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.पंतप्रधान म्हणाले, सर्वच शूरवीर जवानांना मी सलाम करतो. त्यांचं बलिदान कधीही विसरता येणारं नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे. जवानांचं वाहन घातपात करून उडवून देणाऱ्या ‘त्या’ नक्षलवाद्यांना सोडणार नसल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.

कुरखेडा घटनेऩतर सिमावर्ती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सीमेवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून नक्षलग्रस्त पोलीस ठाणे वलआऊटपोस्ट मधील कर्मचारी व अधिकारी यांना सजग राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती गोंदिया पोलीस अधिक्षक विनिता साहू यांनी दिली .