नक्षलहल्ला, दुष्काळी चर्चेसाठी आज मंत्रिमंडळ बैठक,शहीदांवर आज होणार अंत्यसंस्कार

0
89

मुंबई/गोंदिया,दि.02 :गडचिरोली येथील नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या. काही लोक देशातील लोकशाही खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. जवानांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथील हल्ल्याचा निषेध केला. नक्षली हल्ला,दुष्काळी उपाययोजनांसाठी आज गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,गृहराज्यमंत्री,केंद्रीय गृहराज्यमंत्री हे गडचिरोली येथे दाखल होऊन शहीदांना आदराजंली वाहणार असल्याचे वृत्त आहे.

१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा जवळील लेंढारी नाल्याजवळ नक्षल्यांनी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवून दिले. या हल्ल्यात जलद प्रतिसाद दलाचे १५ जवान शहीद झाले. तसेच खासगी वाहनाचा चालकसुध्दा या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी घटनेचा निषेध नोंदवित मुख्यमंत्र्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.शहीद जवानामध्ये भंडारा,हिंगोली,बुलडाणा,यवतमाळ,गडचिरोली व मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील जवानांचा समावेश आहे.नक्षल कारवायांवर नियंत्रणात या कमांडोची महत्वाची भुमिका असते. फक्त नक्षलविरोधी कारवायांसाठीच या जवानांची निर्मिती केली जाते. अत्यंत चपळाईनं हल्ला परतवून लावण्यात ते माहीर असतात. आदिवासी समाजातूनच त्यांची बहुतांशी निवड केली जाते. अशा प्रकारच्या सी-60 जवानांचा ताफा उडवल्याने आपले खुप मोठे नुकसान झाले आहे. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) मधे काही चुका नक्कीच झाल्याचा संशय असून ही सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याची घंटा मानली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा आणि पुराडा पोलिसांची पथके तत्काळ घटनास्थळी पोहचली; मात्र परिसरातच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तब्बल 45 मिनिटे ही चकमक सुरू होती; मात्र पोलिसांपुढे टिकाव लागणार नाही, असे लक्षात आल्याने नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी दुपारपासून जांभूळखेडा गावालगतच्या जंगल परिसरात “कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले होते,ते रात्रीपर्यंत सुरुच होते.आज गुरुवारला पुन्हा कोरची ते कुरखेडा मार्गावर कोंबीग आपरेशन सुरु करण्यात आले आहे.गोंदिया जिल्हयाच्या सिमावर्तीभागातूनही पोलिसांनी सर्चिंग सुरु केलेले आहे.

कसनासूर घटनेचा बदला!-भामरागड तालुक्‍यातील कसनासूर गावालगत वर्षभरापूर्वी पोलीस आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत काही 40 नक्षलवादी ठार झाले होते. यात नक्षलवादी संघटनेच्या चार दलम कमांडरचाही समावेश होता. या घटनेनंतर नक्षलवादी खवळले होते. या घटनेचा आम्ही बदला घेऊ, असा इशारा त्यांनी अनेकदा पत्रकातून दिला होता.त्यातच दोन दिवसापुर्वी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजीचे माजी आमदार किशोर समरिते यांच्या वाहनाला लावलेली आग ही घटना सुध्दा इशारा तर नव्हती ना शंका व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी सातत्याने राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षलवाद्यांना मोठ्या घातपाती कारवाया करण्यात अपयश आले; मात्र बुधवारी संधी साधत नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य केले.

माहिती फुटली कशी?–नक्षलवाद्यांच्या शोध मोहिमेसाठी शीघ्र कृती दलाचे 15 जवान एका खासगी वाहनाने निघाले होते. त्या वाहनाचा चालकही खासगी होता. जवान या वाहनाने जात असल्याची माहिती नक्षलवाद्यांपर्यंत पोहचलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे नक्षलवादी त्यांच्या कटात यशस्वी झाले, अशी टीका होत आहे

भंडाराः-नक्षलवाद्यांच्या या भुसुरुंग स्फोटात भंडारा जिल्ह्यातील तीन जवान शहीद झाले. त्यात लाखनी येथील भूपेश पांडुरंग वालोदे, साकोली येथील नितिन तिलकचंद घोरमारे आणि लाखांदुर तालुक्याच्या दिघोरी मोठी येथील दयानंदभाऊ शहारे यांचा समावेश आहे.

हिंगोली :गडचिरोलीतील या दुर्घटनेत  हिंगोलीचे भूमिपुत्र संतोष देविदास चव्हाण हे शहीद झाले आहेत. शहीद संतोष चव्हाण यांच्या हिंगोलीतील औंढा तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील मूळ रहिवासी गावात ही बातमी समजताच सर्वत्र शोककळा पसरली. शहीद संतोष देविदास चव्हाण 2011 मध्ये पोलिसात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई वडील दोन मुले असून एक 3 वर्ष तर दुसरा 3 महिन्यांचा मुलगा आहे. तसेच वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत.

बुलडाणाः-जिल्ह्यातील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, आळंद, ता. देऊगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) या जवांनांचाही शहीदामध्ये समावेश आहे. नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट केला होता, त्यात हे दोघे शहीद झाले.शहीद राजू गायकवाड यांचे आई-वडील घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगोलग गडचिरोलीकडे रवाना झाले आहे. मेहकर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील वॉर्ड क्र. सात मध्ये ते कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ हा वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आजारपणात मृत्यूमुखी पडला होता. शहीद राजू गायकवाड हे २००९ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना पाच वर्षाची मुलगी (गायत्री), आठ महिन्याचा एक मुलगा (समर्थ) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील त्यांची सासुरवाडी असून १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. पत्नी स्वाती, एक मुलगी नयना (३), आई, वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सकाळपासून पतीचा फोन लागत नसल्यामुळे पत्नी स्वाती हीने आळंद येथे कुटुंबियांना माहिती दिली होती. तेवढ्यात दृकश्राव्य माध्यमावर गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खार्डेचे कुटुंबीय व नातलग हे गडचिरोलीकडे रवाना झाले होते.
दरम्यान, या दुर्देवी घटनेची शहीद जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून येणार्या सुचनेनुसार शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

यवतमाळ – कुरखेडा येथे झालेल्या भुसुरुंग स्फोटात आर्णी तालुक्यातील तरोडा येथील वीर जवान अग्रमन बक्षुजी रहाटे (वय 31) हा पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. त्यांच्यावर तरोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अग्रमन बक्षुजी रहाटे (३१) रा. तरोडा हे गडचिरोली पोलीस दलात सहा वर्षांपुर्वी दाखल झाले होते. नक्षलवादीविरोधी कारवाई करत असताना महाराष्ट्रदिनी त्यांना विरमरण आले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नातेवाइक त्यांचे पार्थिव आणायला गेले आहेत. अंत्यसंस्काराबद्दल आणखी वेळ निश्चित झालेला नाही, अशी माहिती तहसीलदार श्रीकांत निळे यांनी दिली.

शहीद जवान व त्यांची नावेः-

पोलीस शिपाई -साहुदास बाजीराव मडावी रा. चिखली ता. कुरखेडा,जि.गडचिरोली,       पोलीस शिपाई- प्रमोद महादेवराव भोयर देसाईंगज,जि.गडचिरोली

पोलीस शिपाई-राजु नारायण गायकवाड मेहकर जि. बुलढाणा,              पोलीस शिपाई-किशोर यशवंत बोबाटे आरमोरी जि. गडचिरोली,

पोलीस शिपाई-संतोष देविदास चव्हाण ब्राम्हणवाडा ता. औंध जि. हिंगोली,             पोलीस शिपाई-सर्जेराव एकनाथ खरडे आळंद ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा,

पोलीस शिपाई-दयानंद ताम्रध्वज शहारे रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा ,                  ,पोलीस शिपाई-भुपेश पांडुरंग वालोदे लाखनी जि. भंडारा,

पोलीस शिपाई-आरिफ तौशिब शेख रा. पाटोदा जि. बिड,                    पोलीस शिपाई-योगाजी सिताराम हलामी रा. मोहगाव ता. कुरखेडा ,

पोलीस शिपाई-पुरणशहा प्रतापशहा दुगा भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली,                   पोलीस शिपाई-लक्ष्मण केशव कोडापे रा. येंगलखेडा ता. कुरखेडा ,

पोलीस शिपाई-अमृत प्रभुदास भदाडे रा. चिंचघाट ता. कुही जि. नागपूर,     पोलीस शिपाई-अग्रमान बक्षी रहाटे रा. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ

पोलीस शिपाई-नितीन तिलकचंद घोडमारे रा. कुंभाली ता. साकोली जि. भंडारा या जवानांचा समावेश आहे.         खासगी वाहन चालकाचे सोमेश्वर सिहंनाथ असे नाव आहे.

सी-60 ची पार्श्वभुमी: गडचिरोली जिल्हयाचे विभाजन झाल्यापासून नक्षल कारवायांमध्ये वाढ झाली. म्हुणून नक्षल कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठीच 01/12/1990 रोजी के.पी. रघुवंशी (पोलिस अधीक्षक, गडचिरोली) यांनी सी-60 ची स्थापना केली. तेव्हा सी-60 मध्ये फक्त 60 सक्षम व विशेष कमांडोची नेमणूक करण्यात आली व पोलिस निरीक्षक एस.व्ही. गुजर हे सी-60 चे पहिले प्रभारी अधिकारी होते.गडचिरोली जिल्हयात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने परत त्यांचेवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली ला दोन विभागात विभाजन केले (उत्तर विभाग व दक्षिण विभाग) दक्षिण भागात नक्षल कारवायांवर वाढ झाल्याने प्राणहिता उपमुख्यालय येथे मार्च 1994 साली सी-60 चे दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली.सी-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे. सी-60 पथक हे नक्षल्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाते. सी-60 पथकाला यापूर्वी (क्रॅक कमांडो) या नावाने सुध्दा ओळखले जात होते.प्रशिक्षित सी-60 येथील जवान कठोर परिश्रम घेवून गडचिरोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात जावून पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये नक्षल विरोधी अभियान राबवितात. दरम्यान नक्षल चळवळी मध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना भेटून त्यांना आतमसमर्पण बाबत विविध शासकिय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करुन त्यांचा लाभ घेवण्यास त्यांचे मन परिवर्तन करुन त्यांना लोकशाही च्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. मात्र कट्टर नक्षल वरील शासकिय योजनेला व लोकशाहीला विरोध करुन लोकांना शासना विरुध्द भडकवतात अशा जहाल व कट्टर नक्षल्यांचा शोध घेवून खात्मा केला जातो. तसेच त्यांचे व नक्षल चळवळीस आळा घालण्यास बहुमोल सहकार्य केले तसेच अतिदुर्गम भागामध्ये जावून जनसंपर्क साधुन शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडुन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम या जवान योग्यरित्या पार पाडत आहे