संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण वाढले आरोग्य अभियानाचे यश

0
16

गोंदिया -जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेंनी विशेष लक्ष दिले. १२ एप्रिल २०१५ पासून राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाची जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणी केली. आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्यविषयक सुविधांचा लाभ नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून माता मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, प्रजनन दर कमी करणे, तसेच सार्वजनिक स्वच्छता, शुद्घ पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे, साथीच्या रोगाचे प्रमाण कमी करुन त्यामुळे होणारे मृत्यू टाळणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे स्वरुप बदलले असून त्यात तत्परता आली आहे. सन २००६ मध्ये जिल्ह्यातील आरोग्य संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण ३९ टक्के होते. सन २०१४ मध्ये या अभियानाचा लाभ घेतल्यामुळे हे प्रमाण ९९ टक्के झाले आहे. प्रसुतीपूर्व नोंदणी, लसीकरण, कुटुंबकल्याण शस्त्रक्रीया, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, मातृत्व अनुदान योजना, आशा योजना, माहेर योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यू बॉर्न बेबी कॉर्नर या सर्व सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
गरोदर माता व बालकांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन त्या सेवांचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत प्रकल्प सुरु करण्यात आला असून त्यामध्ये गरोदर मातांची व बालकांची नोंदणी करण्यात येते. वर्ष २०१४-१५ मध्ये ग्रामीण व शहरी भागातील गरोदर मातांचे ६५.१८ टक्के वार्षिक उद्दिष्ट पूर्ण झाले असून जीवंत बालकांचे ६९.५२ वार्षिक उद्दिष्टांची नोंद पूर्ण झाली आहे.
आरोग्य यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आरोग्यविषयक विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळत असून शासनाच्या आरोग्य सेवेप्रती नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. त्याचाच हा प्रत्यय आहे.