जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती टिकास आणि फावडे !

0
62

वाशिम, दि. ०२ : पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी हाती टिकास आणि फावडे घेवून या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्यासोबत विविध शासकीय विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनीही  याठिकाणी श्रमदान केले.

यंदा कारंजा लाड व मंगरूळपीर तालुक्यातील १२० गावांनी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावांमध्ये श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु झाली आहेत. या कामामध्ये शहरातील लोकांचा सहभाग मिळावा, त्यांनाही गावकऱ्यांसोबत श्रमदान करण्याची संधी मिळावी, यासाठी १ मे २०१९ रोजी पानी फाउंडेशनच्या वतीने मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द व कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे ‘महाश्रमदान’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी यांनी या महाश्रमदानामध्ये सहभागी होवून गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या गावकऱ्यांचा उत्साह वाढवावा, असा या उपक्रमाचा उद्देश होता.

पिंप्री खुर्द येथे सकाळी ६ वाजलेपासूनच मोठ्या उत्साहात श्रमदानाला सुरुवात झाली. यामध्ये महिला व विद्यार्थ्यांच्या सहभाग लक्षणीय होता. वाशिम येथील ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. मोडक यांचे पिंप्री खुर्द येथे श्रमदानासाठी आगमन झाले. स्वतः जिल्हाधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह श्रमदानामध्ये सहभागी झाल्याचे पाहून तेथील नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला. दुष्काळाशी दोन हात करण्याचा निश्चय करून श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थ व जलमित्रांना यामुळे प्रोत्साहन मिळाले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील १२० गावे सहभागी झाली आहेत. यापैकी अनेक गावांतील नागरिक मोठ्या जिद्दीने जलसंधारणाच्या कामांमध्ये श्रमदान करीत आहेत. स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय बक्षीस पटकाविण्याचे ध्येय ठेवून सर्व गावांनी जलसंधारणाची कामे करावीत. त्यासाठी प्रशासकीय स्तरावरून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.श्री. मीना म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे आपले गाव पाणीदार बनविण्याची संधी गावकऱ्यांना प्राप्त झाली आहे. आपापसातील मतभेत बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्रित येवून काम केल्यास जलसंधारणाची कामे गतीने होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

महाश्रमदानामध्ये उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष श्याम जोशी यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संघटना, संस्था यांनी सहभाग घेतला. जिल्ह्याबाहेरूनही अनेकजण श्रमदानासाठी याठिकाणी आले होते. श्रमदानासाठी आलेल्या सर्वांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येत होते. पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी उपस्थितांना सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.