गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा एकात्मिक किड व्यवस्थापन

0
28

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यातील कापुस हे पिक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. येत्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्याचे दृष्टिने आतापासून प्रभावीपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत केल्याशिवाय तरणोपाय नाही. गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत करण्यासाठी सर्व कापुस उत्पादक शेतकरी बांधवांनी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

शेवटच्या वेचणीनंतर शेतातील पऱ्हाट्यांचे श्रेडर, रोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान लहान तुकडे करुन शेतात गाळणे किंवा त्यांचा वापर शेताबाहेर कंपोस्ट खड्यात टाकावीत. शेतातील पालापाचोळा जमा करुन संपुर्ण शेत तथा बांध स्वच्छ करण्यात यावे. मे मध्ये जमीनीची खोल नागरणी करावी, जेणेकरुन किडीच्या जमिनीत असलेल्या अवस्था उदा. कोषवर येऊन उन्हामुळे नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. कापुस पिकाची पुर्व हंगामी मे महिन्यातील लागवड टाळणे, किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापुस लागवड करु नये.

पुर्वी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य, लागवड केलेली जमीन कापुस लागवडीसाठी निवडावी. या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी / आश्रीतपिक) कपाशीची लागवड करावी. तसेच कपाशीवरील किडीच्या नैसर्गीक शत्रू किटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ लावावी. या प्रमाणे नियोजन केल्यास निश्चितच गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण करणे शक्य होईल. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणाची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी.

शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावरुन खात्रीच्या बियाण्याची खरेदी करावी व खरेदीची पावती संबधीत कृषी सेवा केंद्राकडून घ्यावी. ती जतन करुन ठेवावी. तसेच पेरणीच्या वेळी पिशवी उलट्या बाजुने फाडून पिशवी वरील अत्यावश्यक माहिती जसे लॉट नंबर, वाण स्वत:कडे जपुन ठेवावी. कपाशीची हंगामपुर्व लागवड टाळावी शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाऱ्या बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जुन महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करावी. युरीया खताचा जास्त वापर टाळावा, जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृत परिक्षण करुन त्यांच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तीन महिन्यांपर्यत किटकनाशकाचा वापर टाळावा. जेणे करुन मित्र किडीचे संरक्षण होईल, या काळात वनस्पतीजन्य किटनाशके, जैव किटकनाशके, मित्र किडींचा वापर करावा,पिकांच्या लागवडीनंतर ४५ दिवसात फेरोमन ट्रॅपचा वापर हेक्टरी 5 या प्रमाणे वापर करावा व पिकांतील बदलाच्या निरिक्षणांची नोंद घ्यावी, पिक लागवडीपासून काढणीपर्यत दर आठवडयाला पिकांमधील किडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तिव्रता पाहून आर्थिक नुकसानीची पातळी गाठली असल्यास फक्त रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.