मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन

0
95

वाशिम, दि. ०३ : अमेरिकन लष्करी किड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजुस अलट वाय (Y) आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेगमेंटवर चौकोनी आकारात चार ठिपके दिसून येतात व त्या ठिपक्यावर केसही आढळून येतात. या किडीचा जीवनक्रम अंडी, कोष व पतंग अशा चार अवस्थेत पुर्ण होतो. एक मादी सरासरी १५०० ते २००० अंडी देऊ शकते. पुंजक्यात घातलेली अंडी घुमटाच्या आकाराची असून अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसांची असते. अळी अवस्था १५ ते ३० दिवस सहा वेळा कात टाकून पुर्ण होते.

प्रथम अवस्थेतील अळी आकाराने लहान, रंगाने हिरवी असून त्यांचे डोके काळया रंगाचे असते. दुसऱ्या अवस्थेत अळीचे डोके नारंगी रंगाचे होते. तिसऱ्या अवस्थेत अळीच्या शरीरावर दोन्ही बाजुने पांढऱ्या रेषा दिसण्यास सुरुवात होते व अळी तपकीरी रंगाची होते. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर काळे उंचवटयासारखे ठिपके दिसून येतात. पुर्ण वाढ झालेली अळी २ ते ८ सें. मी. खोलीवर जमीनीत जाऊन मातीचे आवरण करते आणि त्या आवरणात कोषावस्थेत जाते. हा कोष लालसर तपकिरी रंगाचा असून वातावरणानुसार कोषावस्था ८ ते ३० दिवसापर्यंत पुर्ण होते. प्रौढ पतंग निशाचर असून उष्ण व दमट वातावरणात खुपच सक्रिय असतात. नर पतंगामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकिरी रंगाचा छटा असून टोकाला त्रिकोणी पांढरे टिपके असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकित असून एकसमान राखाडी तपकिरी रंगाचे असतात. अशा प्रकारे हा लष्करी अळी आपला जीवनक्रम ३० ते ९० दिवसात पुर्ण करते. ऊस, भात, ज्वारी, गहू, कापुस, सोयाबीन या पिकांवर देखील या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शेतकरी बंधुनी किडीच्या व्यवस्थापनाकरीता पुढील प्रमाणे उपाय योजना करणे आवश्यक आहेत.

किडग्रस्त पिकांच्या शेतातील खोल नागरणी दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे किडीच्या वेगवेगळया अवस्था नष्ट करण्यास मदत होईल, पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीचे पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळयाचा वापर करावा, पिकावरील अंडीसमूह अळया हाताने गोळा करुन नष्ट कराव्यात,टेलनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे एकरी ५० हजार अंडी या प्रमाणे शेतात सोडावेत. त्यानंतर ४ ते ५ दिवसापर्यंत रासायनिक किटकनाशकांची फवारणी करु नये, ॲझेडिरॅक्टीन १५०० पीपीएम किंवा निबोंळी अर्क ५ टक्के ५० मि. ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. ज्युमोरीया रिलई किंवा मेटाऱ्हिझीयम ॲनीसोप्ली या जैवीक किटकनाशकांची ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. पिक लागवडीपासून काढणीपर्यंत दर आठवडयाला पिकांमधील किडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानची पातळी गाठली असल्यास फक्त रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. वरील प्रमाणे उपाय योजना करुन पुढील कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.